बीड : आमदार धनंजय मुंडे यांच्या बंगल्यातून फोन आल्यामुळेच महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास थांबल्याचा गंभीर आरोप महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना केला. त्या वेळी वाल्मीक कराड हाच सर्व कारभार पाहत होता, असा दावा करत त्यांचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणानंतर महादेव मुंडे खून प्रकरणातही धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्यावर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.
महादेव मुंडे यांच्या खुनाला २० महिने उलटले आहेत. यात न्याय न मिळाल्याने बीड येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच पत्नी ज्ञानेश्वरी यांनी बुधवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्या सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नसून आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी ज्ञानेश्वरी यांची भेट घेतली. तर, खा. सुप्रिया सुळे व आ. जितेंद्र आव्हाड यांनी फोनवरून विचारपूस केली. या प्रकरणात आ. धनंजय मुंडे यांचा फोन न लागल्याने स्वीय सहायक प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क केला, त्यांनी आपण सोबत नसल्याचे सांगितले. त्यामुळे धनंजय मुंडे यांची बाजू समजू शकली नाही.
मुलांच्या मनातून शंका दूर करायचीयआपल्या मुलांच्या मनातून त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची (खून प्रकरणाची) शंका दूर करायची आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यास मुलांना या घटनेमागील सत्य समजेल आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूसाठी ते जबाबदार नाहीत, ही भावना त्यांच्या मनात रुजेल. मुलांना या त्रासातून बाहेर काढण्यासाठी न्याय मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचेही ज्ञानेश्वरी म्हणाल्या.
...तर पुन्हा आत्महत्याचा प्रयत्न करेनएका महिन्यात न्याय मिळाला नाही, तर मी पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करू शकते. मुलांच्या मनातील संशय दूर करण्यासाठी आणि खुन्यांना पकडण्यासाठी तातडीने न्याय मिळण्याची मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली. तसेच मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या संभाषणाची ही ज्ञानेश्वरी यांनी आठवण करून दिली.
धनंजय मुंडे अडचणींत वाढमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले. तर, राष्ट्रवादीचे आ. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले. आता महादेव मुंडे खून प्रकरणातही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आ. मुंडे यांच्यावर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.