स्फोटात डोळे गमावले, अंगठाही तुटला; जिद्दीने मिळवले दहावीत ७१ टक्के गुण

By सोमनाथ खताळ | Updated: May 16, 2025 18:42 IST2025-05-16T18:42:16+5:302025-05-16T18:42:58+5:30

माझ्यावर अन्याय झाला तेव्हा यंत्रणेने दखल घेतली नाही; म्हणून न्यायासाठी पोलिस किंवा वकील होणार

Lost eyes and broke thumb in explosion; Stubbornly scored 71 percent in 10th exam | स्फोटात डोळे गमावले, अंगठाही तुटला; जिद्दीने मिळवले दहावीत ७१ टक्के गुण

स्फोटात डोळे गमावले, अंगठाही तुटला; जिद्दीने मिळवले दहावीत ७१ टक्के गुण

बीड : दहावीच्या वर्गातील मुलाला जिलेटिन स्फोट घेणाऱ्या ट्रॅक्टरवर कामावर ठेवले. नंतर कांड्या रोवताना अचानक स्फोट झाला आणि यात मुलाचे दोन्ही डोळे गेले, शिवाय उजव्या हाताचा अंगठाही तुटला. हे प्रकरण राज्यात गाजले. आता याच बालकामगाराने जिद्दीने लेखकाच्या मदतीने परीक्षा दिली. दहावीत त्याला ७१ टक्के मिळाले आहेत.

आनंद विकास हालकडे (वय १५, रा. विडा, ता. केज) असे यशस्वी विद्यार्थ्याचे नाव आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गोकूळ शेषेराव ढाकणे (वय ३२), शेषेराव ढाकणे (वय ६१, दोघेही रा. सारोळा पाटी, ता. केज) आणि शिवाजी ठोंबरे (वय ३५, रा. वडमाउली दहिफळ, ता. केज) यांनी आनंदला जिलेटिन स्फोट करणाऱ्या ट्रॅक्टरवर कामाला ठेवले. ९ एप्रिल २०२४ रोजी काम करताना विहिरीमध्ये अचानक स्फोट झाला आणि यात आनंदचे दोन्ही डोळे गेले. शिवाय त्याचा डावा हात कोपरातून आखडला, तर उजव्या हाताचा अंगठा तुटला. पोटावर, हातावर, तोंडावर, छातीवर गंभीर जखमा झाल्या होत्या.

तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल
आनंदची आई पार्वती यांनी गुन्हा दाखल करावा म्हणून केज पोलिस ठाण्यात खेट्या मारल्या. परंतु, पोलिसांनी टाळाटाळ केली होती. ३ जुलै २०२४ रोजी पार्वती या आनंदला घेऊन जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी आल्या. तेथे सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना हे समजले. त्यांनी पाठपुरावा करून हे प्रकरण महिला व बालकल्याण समितीकडे पाठविले. अध्यक्ष अशोक तांगडे यांनी पत्र काढल्यावर मग कारवाईला वेग आला आणि आरोपींविरोधात पोलिसांनी १० जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

वकील, पोलिस व्हायचंय
माझ्यावर अन्याय झाल्यावर आईने खूप खेटे मारले. परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. पण, न्यायासाठी पोलिस आणि वकील हे दोनच पदे महत्त्वाची आहेत. मलाही पुढे चालून गरिबांच्या मदतीसाठी याच दोन क्षेत्रात करिअर करायचे, असे आनंद सांगतो.

ब्रेन लिपीतून घेणार शिक्षण
आनंदने विडा येथील श्रीरामकृष्ण विद्यालयात दहावीचे शिक्षण घेतले. परीक्षेत ९ वीच्या वर्गातील मुलाच्या मदतीने पेपर सोडविले. इंग्रजीत त्याला ७२ गुण आहेत. आता महाविद्यालयीन शिक्षण ब्रेन लिपीतून आनंद घेणार आहे. त्यासाठी अहिल्यानगरला सोय केली जात असल्याचे तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Lost eyes and broke thumb in explosion; Stubbornly scored 71 percent in 10th exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.