लोकमतचे प्रतिनिधीच बनले ‘देवदूत’; कडी नदीच्या पुरातून दोन कुटुंबांना बाहेर काढून वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:14 IST2025-09-16T19:13:27+5:302025-09-16T19:14:53+5:30
नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या शेतीत राहणारी दोन कुटुंबे पुराच्या पाण्याने वेढली गेली. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले होते.

लोकमतचे प्रतिनिधीच बनले ‘देवदूत’; कडी नदीच्या पुरातून दोन कुटुंबांना बाहेर काढून वाचवले प्राण
कडा (बीड) : आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी गावात सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे कडी नदीला आलेल्या महापुरात अडकलेल्या दोन कुटुंबांसाठी 'लोकमत'चे प्रतिनिधी नितीन कांबळे आणि त्यांचे सहकारी प्रदीप साबळे देवदूत बनून धावले. नदीच्या दोन्ही बाजूने पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत असताना, त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, ही धोक्यातील कुटुंबे सुरक्षित बाहेर काढली आणि माणुसकीचे दर्शन घडवले.
सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे घाटापिंपरी परिसरात हाहाकार उडाला. कडी नदी आणि आजूबाजूचे ओढे दुथडी भरून वाहत होते. नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या शेतीत राहणारी दोन कुटुंबे पुराच्या पाण्याने वेढली गेली. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले होते. त्यांच्या घराभोवती पाण्याचा वेढा वाढत असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.
पत्रकार म्हणून कर्तव्य आणि माणुसकी
या घटनेची माहिती मिळताच, ‘लोकमत’चे प्रतिनिधी नितीन कांबळे आणि त्यांचे सहकारी प्रदीप साबळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 'बातमी कव्हर करायची' या भूमिकेऐवजी त्यांनी 'माणुसकी वाचवायची' या भूमिकेतून परिस्थितीकडे पाहिले. पुराचा जोर मोठा असूनही, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पाण्यात उडी घेतली. कमरेपर्यंत पाण्यातून मार्ग काढत ते अडकलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना धीर दिला आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केली. यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश होता. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.
‘बातमी देण्यापलीकडचे काम’
या धाडसी आणि संवेदनशील कामगिरीमुळे नितीन कांबळे आणि प्रदीप साबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीमुळे नैसर्गिक आपत्तींच्या काळात पत्रकारांची भूमिका केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसते, तर ती समाजसेवेची आणि मदतीचीही असू शकते, हे सिद्ध झाले आहे. एका बातमीदाराने फक्त घटनेची नोंद न घेता, फक्त कॅमेरात कैद न करता, त्यातील पीडितांना मदत करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
या घटनेमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्यांना तातडीने मदत पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. समाजासाठी असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून केलेल्या या धाडसी कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.