३१ मेपर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST2021-05-25T04:37:48+5:302021-05-25T04:37:48+5:30
बीड : कोरोना रुग्णांची संख्या प्रभावीपणे कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यात पुन्हा ३१ मेपर्यंत कडक लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र ...

३१ मेपर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला
बीड : कोरोना रुग्णांची संख्या प्रभावीपणे कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यात पुन्हा ३१ मेपर्यंत कडक लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे. त्यानुसार २५ मे रोजी रात्री १२ वाजेपासून ३१ मे रात्री १२ वाजेपर्यंत आदेश लागू राहणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डीलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, पेट्रोल पंप, टपाल या अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना या कालावधीत सुरू राहणार नाहीत.
दूध विक्रीसाठी प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत तर भाजीपाला केवळ हातगाडीवरून विक्रीस ७ ते ९ वाजेपर्यंत परवानगी राहील. गॅस वितरण दिवसभर सुरू राहणार आहे. बँक, ग्राहक सेवा केंद्रांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोल पंप व गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार, वैद्यकीय कारणास्तव केले जाणारे व्यवहार, सर्व शासकीय योजनेचे लाभार्थींचे वेतनाबाबतचे व्यवहार, अत्यावश्यक सेवेशी संबंधित आस्थापनांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा दिली आहे. दरम्यानच्या काळात एटीएम कॅशच्या वाहनांना परवानगी तसेच दुपारी १ ते ४.४५ वाजेपर्यंत बँक कर्मचाऱ्यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा दिली आहे.
शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरू राहतील. (कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.) ४५ वर्षांवरील ज्या व्यक्तींना डोससाठी मेसेज व आरोग्य विभागाचे पत्र मिळाले, त्यांनाच लसीकरणाचा डोस घेण्यासाठी जाण्यास परवानगी असणार आहे.
कृषी व्यवसायाशी संबंधित दुकानांसाठी आलेले बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरविण्यास मुभा असून खते - बियाणे विक्रीसाठी सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना २६ मे पासून सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करता येणार आहे.
दहा दिवस मद्यविक्री पूर्णवेळ बंद
जिल्ह्यातील सर्वप्रकारची मद्यविक्री पूर्णवेळ बंद राहणार आहे. या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सील करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.