पाटोदा तालुक्यात बिबट्याचा दोन ठिकाणी हल्ला; तरुण जखमी तर वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 00:07 IST2025-02-07T00:07:12+5:302025-02-07T00:07:19+5:30
पाटोदा परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे

पाटोदा तालुक्यात बिबट्याचा दोन ठिकाणी हल्ला; तरुण जखमी तर वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावातील उखारा शिवारात गुरूवारी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे वय ६५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभाग आणि पोलिस प्रशासनाला याची फोनवरून भगवान शिंदे यांना कळविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोजरबाई धोंडीराम बोबडे या दुपारी १२ वाजता शेतातील जनावराच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे गेल्या होत्या. दुपारी ३ वाजता बिभिषण दासु शिंदे यांनी शेतातील जनावरे आणण्यासाठी जात असताना सोजरबाई यांचा मृतदेह पाहिला. त्यांच्या अंगावरील जखमावरून बिबट्याने नरडीचा घोट घेतल्याचे दिसून आले. त्यांनी सोजरबाई यांच्या नातु जगन्नाथ बबन बोबडे यांना फोनवरून कल्पना दिली. त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. भगवान शिंदे यांनी पाटोदा वनविभागाचे अधिकारी काळे यांना माहिती दिली असून वनविभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तालुक्यातील कारेगाव येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला तरुण जखमी गुरुवारी तालुक्यातील बिबट्याने केलेल्या हल्यात तरूण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी तालुक्यातील कारेगाव शिवारात घडली. कारेगाव येथील गोवर्धन सिताराम येवले (वय ३०) हे सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला, मानेला आणि दंडावर दुखापत झाली आहे. तरुणास पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागरिकांनी दिवसा व रात्री शेतात एकटे जाऊ नये,पीक काढण्यासाठी, पिकांना पाणी देण्यासाठी जाताना बॅटरी ,काठी घेऊन जावे असं आवाहन पाटोद्याचे वन अधिकारी श्रीकांत काळे यांनी केलं आहे.