बिबट्याचा आणखी एका महिलेवर हल्ला; आष्टीत तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 13:37 IST2020-11-29T13:37:20+5:302020-11-29T13:37:45+5:30
आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक भयभीत आहेत.

बिबट्याचा आणखी एका महिलेवर हल्ला; आष्टीत तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली
कडा- शेतातून गवत घेऊन घरी जात असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी 11 वाजता पारगाव येथे घडली. यात महिला गंभीर जखमी झाली असुन तिला उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शालन शाहाजी भोसले असे या जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक भयभीत आहेत.
आष्टी तालुक्यातील पारगांव येथील महिला सकाळी घरातून जनावरांना गवत आणण्यासाठी शेतात गेली होती. गवत घेऊन परत परतत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. बिबट्याची तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली असुन वनविभागाला बिबट्या सापडत नसल्याने तालुक्यातील जनता भयभीत झाल्याचे दिसत आहे. त्या नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा नसता जिवे मारण्याची परवानगी घेऊन त्याची दहशत कमी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केली आहे. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी टीमसह दाखल झाले आहेत.