परळीत शेतकर्यावर बिबट्याचा हल्ला; भोजनकवाडी व मालेवाडी शिवारात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:55 IST2018-06-18T20:55:31+5:302018-06-18T20:55:31+5:30
तालुक्यातील भोजनकवाडी येथील शेतात बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी अंकुश केदार हे जखमी झाले आहेत.

परळीत शेतकर्यावर बिबट्याचा हल्ला; भोजनकवाडी व मालेवाडी शिवारात दहशत
परळी (बीड ) : तालुक्यातील भोजनकवाडी येथील शेतात बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी अंकुश वसंत केदार हे जखमी झाले आहेत. भोजनकवाडी परिसरातून बिबट्या आता मालेवाडी शिवारात गेला असून बीगदरा येथे आज सकाळी काही शेतकऱ्यांनी त्याला पाहिला आहे.
रविवारी दुपारी 2 च्या सुमारास भोजनकवाडी येथील स्वतःच्या शेतात अंकुश वसंत केदार हे काम करत होते. विहीरीतील पाणी पिऊन अंकुश केदार हे शेतात उभे असतानाच अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी धर्मापुरी येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेतले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. आज परळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.शिंदे व वनपरिमंडळ अधिकारी बी.जी.कस्तुरे यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. भोजनकवाडी शिवारातून बिबट्या मालेवाडी गेला आहे दोन्ही शिवार जवळ आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणची शेतकरी हादरून गेले आहेत. दरम्यान, शेतकर्यानी घाबरून जावू नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.शिंदे यांनी केले आहे.