ग्रामपंचायतीतूनच घडले नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:47+5:302021-01-08T05:47:47+5:30
बीड : ग्रामपंचायत ही भारतीय राजकारणाचा पाया आहे, नेतृत्व घडवणारी स्थानिक स्वराज संस्था आहे. केशरकाकू क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत सदस्य, ...

ग्रामपंचायतीतूनच घडले नेतृत्व
बीड : ग्रामपंचायत ही भारतीय राजकारणाचा पाया आहे, नेतृत्व घडवणारी स्थानिक स्वराज संस्था आहे. केशरकाकू क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंचापासून राजकीय जीवनाची कारकीर्द सुरू करून आमदार, तीन वेळा खासदार, अशी गरुडझेप घेत राजकारणात आपला ठसा उमटविला.
केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर, असे त्यांचे नाव असले तरी संपूर्ण राज्यात त्या काकू या टोपणनावानेच त्या ओळखल्या जात. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या केशरकाकू यांनी जनसंपर्क वाढवत प्रस्थापितांविरुद्ध सर्व जाती-धर्मांना सोबत घेत राजकारणाच्या व्यासपीठावर समाजकारण केले. त्यांच्या या समाजकारणाच्या पायावर दुसऱ्या पिढीतील माजी मंत्री जयदत्त आणि बीडचे नगराध्यक्ष डाॅ. भारतभूषण क्षीरसागर राजकारणात यशस्वी झाले. आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत, डाॅ. योगेश क्षीरसागर ही तिसरी पिढी यशस्वी होत आहे.
केशरकाकू यांनी लोकांची कामे करत जनसंपर्क एवढा वाढवला होता की, १९७२ साली त्या चौसाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार होत त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या कट्टर समर्थक होत्या. राजुरी येथे गजानन सहकारी साखर कारखाना काढून त्या सहकार क्षेत्रात उडी घेत चेअरमन झाल्या. चेअरमन होणाऱ्या त्या राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या महिला होत्या. या गोष्टीचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना खूप कौतुक वाटायचे. त्यांनी या साखर कारखान्यास सर्वतोपरी मदत केली. अशा प्रकारे त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला होता.
केशरकाकूंची जिल्ह्यावरील पकड पाहता त्यांना काँग्रेस (आय)ने १९८० साली बीड लोकसभा मतदारसंघांची उमेदवारी दिली. जवळपास ६७ हजारांच्या फरकाने निवडणूक जिंकत त्यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरविला. त्यानंतर त्यांनी १९८४ आणि १९८९ ची लोकसभा निवडणूकही जिंकली. त्यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात अनेक संसदीय समित्यावर प्रतिनिधित्व केले. अनेक शैक्षणिक संस्था काढून विद्याज्ञानासोबतच हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. थोडक्यात सांगायचे झाल्यास ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणाचा पाया असून, नेतृत्वाची संधी देणारी स्थानिक स्वराज संस्था आहे.
केशरकाकू यांनी १९५९ ते ६२ या काळात बीड तालुक्यातील नवगण राजुरी ग्रामपंचायत सदस्यांपासून राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. याच काळात त्या राजुरीच्या सरपंचही झाल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता त्या राजकारणात यश मिळवत गेल्या. १९६९-७८ मध्ये त्या बीड पंचायत समितीच्या सभापती झाल्या.