रुग्णसेवेत हलगर्जी; बीडमधील सहा डॉक्टरांना थेट घरचा रस्ता! आरोग्य विभागात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:04 IST2025-11-04T20:04:24+5:302025-11-04T20:04:34+5:30
आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी हजर राहत नसल्याने सामान्य रुग्णांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

रुग्णसेवेत हलगर्जी; बीडमधील सहा डॉक्टरांना थेट घरचा रस्ता! आरोग्य विभागात खळबळ
बीड : मजूर आणि वंचित लोकांना दिवस-रात्र प्राथमिक आरोग्यसेवा मिळावी, या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आणि शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रातील सहा कंत्राटी डॉक्टरांना कामचुकारपणा चांगलाच महागात पडला आहे. कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल या सहाही डॉक्टरांना थेट घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी हजर राहत नसल्याने सामान्य रुग्णांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच तक्रारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांना अचानक भेटी देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, डॉ. गंडाळ यांच्यासह सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी बीड शहरातील सर्व दवाखान्यांना भेटी दिल्या. या अचानक भेटीत ‘आपला दवाखाना’सह पाच आरोग्य वर्धिनी केंद्रातील सहा डॉक्टर गैरहजर आढळले. वारंवार सांगूनही सुधारणा न झाल्याने या सहाही डॉक्टरांना तडकाफडकी कार्यमुक्त करून घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. या कारवाईने सामान्यांमध्ये समाधान असले तरी, हलगर्जी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रिक्त झालेल्या जागांवर लवकरात लवकर भरती केली जाईल आणि सोमवारी नवीन डॉक्टर भरले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचा उद्देश
साधारण दोन वर्षांपूर्वी प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे ‘आपला दवाखाना’ आणि इतर शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रे सुरू करण्यात आली. बीड जिल्ह्यात जवळपास ३३ ठिकाणी असे दवाखाने आहेत, ज्यात बीड शहरात ११ दवाखाने आहेत. या दवाखान्यांची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी आहे, कारण मजूर आणि वंचित घटक दिवसभर कामाला जातात. त्यांना प्राथमिक उपचार मिळावेत, या हेतूने हद्दवाढ आणि स्लम एरियात हे दवाखाने सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई अशी पदे भरण्यात आली आहेत आणि औषधीसाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च केला जातो.
काही ठिकाणी ८ वाजताच कुलूप
बीड शहरच नव्हे तर इतर शहरांमध्येही अशीच अवस्था आहे. बंद करण्याची वेळ रात्री १० असतानाही काही जण ८ वाजताच कुलूप लावून गायब होत असतात. याच्याही तक्रारी झाल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी सर्वच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा डॉक्टरांची बैठक घेऊन कान टोचण्याची गरज आहे.
बाथरूमलाच गेलो, पाणीच पीत होतो
यापूर्वी ‘लोकमत’ने या सर्वच आपल्या दवाखान्यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. यात अनेकजण गैरहजर आढळले होते. तेव्हा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची ऑनलाइन बैठक घेतली. तेव्हा मी नेमकेच जेवायला गेलो होतो, बाथरूमलाच गेलो होतो, अशी कारणे एमबीबीएस डॉक्टरांकडून सांगण्यात आली होती. तेव्हा त्यांना समज देऊन कामात सुधारणा करण्यास सांगितले होते. त्यानंतर काही दिवस सेवा सुरळीत चालली. परंतु आता पुन्हा तसाच प्रकार होत असल्याने सहा जणांना थेट घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.