सरत्या वर्षात वरुणराजाची कृपा, दुष्काळ पुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:31 IST2020-12-31T04:31:52+5:302020-12-31T04:31:52+5:30

शिरूर कासार : पाहता पाहता २०२० या वर्षाने काही सकारात्मक तर निराशाजनक घटना दाखवल्या. त्यात दहा वर्षांनंतर तालुक्याला सरत्या ...

In the last year, by the grace of Varun Raja, the drought was eradicated | सरत्या वर्षात वरुणराजाची कृपा, दुष्काळ पुसला

सरत्या वर्षात वरुणराजाची कृपा, दुष्काळ पुसला

शिरूर कासार : पाहता पाहता २०२० या वर्षाने काही सकारात्मक तर निराशाजनक घटना दाखवल्या. त्यात दहा वर्षांनंतर तालुक्याला सरत्या वर्षाने जलसमृद्धी प्रदान केली. पावसाने सरासरी ओलांडून सर्व जलाशये ओसंडून वाहिले, असे विलोभनीय चित्र या वर्षाने दाखवले. मात्र कोरोनासारख्या महामारीने माणूस माणसापासून दूर केला. इतकेच नाही तर सुख-दुःखातही सहभागी होता आले नाही. लग्नाच्या अक्षदा व आशीर्वाद जसे घरबसल्याच द्यावे लागले, तसे अंत्यविधीला देखील जाऊ दिले नाही या वर्षाने.

या महामारीला अटकाव व काबू मिळवण्यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस, शिक्षक, पंचायत समिती यासह सर्वांनाच घाम फोडला. नियमित कामाव्यतिरिक्त कामाचा अनुभव या वर्षाने दिला.

तालुक्याची पावसाची सरासरी ५९९.४ मि.मी. इतकी असताना या वर्षाने ती शिरूर ८३३.७५ मि.मी., रायमोहा ६६३.५ तर तिंतरवणी परिमंडळात ७४३.२५ मि.मी. इतक्या अधिक पटीने ओलांडली. सिंदफणा, उथळा, बेलपारा, घाटशिळा मध्यम प्रकल्पांसह साठवण तलाव, लघू प्रकल्प, नद्या, नाले, विहिरी, बोअर तुडुंब भरले. पावसामुळे नुकसान झाले; परंतु सतत पाणीटंचाई असणाऱ्या या तालुक्याला मावळत्या वर्षाने जलसमृद्धी प्रदान केली.

अवकाळी व अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून जवळपास बावीस कोटी रुपये या वर्षात वाटप केल्याची माहिती तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी दिली.

पोलीस स्टेशन हद्दीत ६९ गावांत वर्षभरात पाच बलात्कार आणि सात विनयभंग, एक खून, सतरा मारामाऱ्या अशा अप्रिय काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या, तर चोरीचे १४ गुन्हे, दखलपात्र गुन्हे ११८, जुगार मटका क्लब ५७ गुन्हे, दारूबंदी ६६, ॲट्राॅसिटी ४ गुन्हे दाखल व अकस्मात ४८ मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पो. नि. सिद्धार्थ माने यांनी सांगितले. कोरोना संकटात नित्य बंदोबस्त करत असतानाच पोलीस संरक्षण कार्यात रात्रंदिवस काम करत होते.

अतिसंवेदनशील काळात बाधित तपासणी, त्यांच्या नोंदी, उपचार करत आरोग्य विभाग तारेवरची कसरत करत होता. तालुक्यात ६५८ बाधित रुग्ण निघाले, तर दुर्दैवाने बारा लोकांना प्राण यावर्षी गमवावा लागला. शिवाय वर्षभरात ४४ लोकांना सापाने डंख मारला होता. यातून मात्र सर्व सहीसलामत उपचारानंतर सुटले. तालुका आरोग्य अधिकारी अशोक गवळी, नोडल ऑफिसर शिवनाथ वाघमारे, राजश्री जाधवर, डॉ. सुहास खाडे, डॉ. किशोर खाडे, डॉ. सानप यांच्यासह सर्व आरोग्य विभाग, आशा, सिस्टर, आरोग्य सेवक, नगरपंचायत, ग्रामसेवक, तलाठी यांनी परिश्रम घेतले. शैक्षणिक क्षेत्रात मात्र मावळत्या वर्षाने शाळेला कुलूप लावले असल्याने शिक्षक व विद्यार्थी यांच्यात प्रदीर्घ काळ दुरावा निर्माण झाला होता. ऑनलाइन शिक्षण दिले जात होते. तालुक्यात प्राथमिक शाळेत ३७७२ मुले तर ४०४४ मुली प्रवेशित असून, माध्यमिकमध्ये मुलांची संख्या ९१३ व मुली ६१२ असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी दिली. अध्यापन करण्यासाठी ४०२ शिक्षक व १३३ शिक्षिका प्राथमिकसाठी तर माध्यमिकसाठी शिक्षक ३६ व शिक्षिका १७ शिक्षण कार्यात आहेत. हा सर्व वर्ग वेगवेगळ्या कामात लाॅकडाउनमध्ये काम करत होता. या वर्षात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेने तालुक्याचे नाव झळकले. या स्पर्धेत हरियाणा संघ लक्षणीय ठरला तरी जिल्ह्यातील संघाने चांगलीच बाजी मारल्याचेही दाखवून दिले.

संकटकाळात सामाजिक बांधिलकी समजावून घेत गरिबांसाठी व गरजूंसाठी अनेक संस्था तसेच वैयक्तिक हात सरसावले होते. त्यात शांतीवन संस्थेचे दीपक नागरगोजे यांनी गरजूंना दोन घास दोन वेळेस भरवण्याचे मोलाचे काम केले.

Web Title: In the last year, by the grace of Varun Raja, the drought was eradicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.