..अखेर कड्यापर्यंत रेल्वे इंजिन धावले, आता बीडकरांना प्रतीक्षा रेल्वेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 19:34 IST2021-11-25T19:32:52+5:302021-11-25T19:34:41+5:30
Railway in Beed : आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील सर्वात लांब रेल्वे पुलावरून इंजिनने आज चाचणी पार पाडली.

..अखेर कड्यापर्यंत रेल्वे इंजिन धावले, आता बीडकरांना प्रतीक्षा रेल्वेची
- नितीन कांबळे
कडा - बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प ( Railway In Beed ) आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आज गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नगरहून कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी केली.पटरीवरून रेल्वे इंजिन धावतानाचे चित्र पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र, आता रेल्वे कधी धावणार याकडे प्रतीक्षा लागली आहे.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे या 261 किलोमीटरच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. नगर ते आष्टी या साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास एक इंजिन नगरवरून आष्टीच्या दिशेने मार्गस्थ झाले. अडीच वाजण्याच्या सुमारास या रेल्वे इंजिनचे आष्टी तालुक्यामध्ये आगमन झाले. सदरील रेल्वे इंजिन हे ट्रॅकची चाचणी करत असून येत्या काही दिवसात लवकरच हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्हावासियांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
सर्वात लांब पुलावरून यशस्वी चाचणी
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील सर्वात लांब रेल्वे पुलावरून इंजिनने आज चाचणी पार पाडली. हा 15 स्पॅनचा पूल असून प्रत्येकाची लांबी 30.5 मीटर आहे. म्हणजेच जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचा तर शंभर फूट उंचीचा हा पुल आहे.
तीन चाचण्यानंतर रेल्वे धावेल
नगर ते कडा इथ पर्यंत गुरूवारी रेल्वे येण्यासाठी आथरलेले रूळाचे अस्थाईकरण करण्यासाठी कुठे चढ उतार किंवा इतर खराब नसावे म्हणून आज या रूळावरून रेल्वे इंजिन चालविण्यात आले. आणखी तीन वेळा ही चाचणी केल्यानंतर रेल्वे धावेल अशी माहिती नगर रेल्वेचे कनिष्ठ अभियंता मिना यांनी दिली.