माजलगाव ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:07+5:302021-07-02T04:23:07+5:30

पुरूषोत्तम करवा माजलगाव : येथील ग्रामीण रूग्णालयात ऐन कोरोना काळात प्रसूतीतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे या रूग्णालयात ५० ...

Lack of doctors in Majalgaon Rural Hospital | माजलगाव ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांचा अभाव

माजलगाव ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांचा अभाव

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : येथील ग्रामीण रूग्णालयात ऐन कोरोना काळात प्रसूतीतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे या रूग्णालयात ५० टक्के महिलांनी पाठ फिरवत खासगी दवाखान्याची वाट धरली तर सिझर करण्याची वेळ आल्याने २२२ महिलांना इतरत्र रेफर करण्याची वेळ आली असतांना देखील वरिष्ठांना याचे काही देणे घेणे राहिले नाही.

माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दोन वर्षाच्या काळात चांगल्या प्रकारे रूग्णांना सुविधा मिळत होत्या. यामुळे दररोज ४००-५०० ओपीडी होत असत. परंतु येथे मागील दोन वर्षांपासून डॉक्टरांच्या अभावामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. या ग्रामीण रूग्णालयात दर महिन्याला १५० ते २०० प्रसूती होत असत. यामुळे हे रूग्णालय मागील २-३ वर्षात नावारूपाला आले होते. परंतु मागील दोन अडीच वर्षांपासून याठिकाणी प्रसूतीतज्ज्ञ व भूलतज्ञ नसल्यामुळे ऐन कोरोनाकाळात प्रसूतीच्या संख्येत मोठी घट झाली. २०२० च्या १ एप्रिल ते ३० जून २०२१ या १४ महिन्यात ७० च्या सरासरीने केवळ ९६७ प्रसूतीची नोंद झाली. त्यापैकी ९६७ महिलांच्या प्रसूती झाल्या. त्यापैकी केवळ २८ सिझर याठिकाणी करण्यात आले. हे सिझर एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० या महिन्यातच झाले होते. ऑगस्ट २०२० नंतर एकही सिझर याठिकाणी करण्यात आले नाही. तर सिझर करण्याची वेळ आल्याने जवळपास मागील चौदा महिन्यात सिझर व इतर कारणांमुळे २२२ महिलांना या रूग्णालयातून इतरत्र रेफर करण्यात आले.

डॉक्टरांच्या अभावामुळे याठिकाणी सध्या केवळ शंभर ते दीडशे ओपीडी होत असल्याची माहिती येथील डॉक्टरांकडून देण्यात आली.

डॉ. सांबळेंकडून अपेक्षा वाढल्या

डॉ. सुरेश साबळे हे मागील अनेक वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी ते वैद्यकीय अधीक्षक पर्यंतचा कारभार सांभाळला होता. आता त्यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकचा कारभार असल्याने त्यांच्याकडून माजलगावकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लवकरच ते येथे डॉक्टर उपलब्ध करतील अशी आशा रूग्णांना वाटत आहे.

या रूग्णालयाला मागील काही महिन्यांपासून प्रसूतीतज्ज्ञ नसल्यामुळे याठिकाणी सिझर करण्यात आले नाही. आम्ही अनेक वेळा वरिष्ठांकडे प्रसूती तज्ज्ञांची मागणी केलेली आहे. लवकरच डॉक्टर मिळतील त्यानंतर सर्व सुरळीत होईल.

--डॉ. गजानन रूद्रवार , वैद्यकीय अधीक्षक ,ग्रामीण रूग्णालय

Web Title: Lack of doctors in Majalgaon Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.