केजकरांची वर्ष सांगता चोरीच्या घटनांनी; लाखोंचा मुद्देमाल पळवला, मारहाणीत महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 18:50 IST2021-12-31T18:50:42+5:302021-12-31T18:50:55+5:30
चोरांच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत.

केजकरांची वर्ष सांगता चोरीच्या घटनांनी; लाखोंचा मुद्देमाल पळवला, मारहाणीत महिला गंभीर जखमी
केज ( बीड ) : शहरातील शिवाजी नगर आणि एका शेतवस्तीवर अशा दोन ठिकाणी आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास चोरी झाल्याच्या घटना घडल्या. दोन्ही घटनेत मिळून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला असून केजकरांची वर्ष सांगता चोरीच्या घटनांनी झाली.
या बाबतची माहिती अशी की, दि. ३१ डिसेंबरच्या पहाटे २:०० वाजेच्या दरम्यान केज-कळंब रोडवरील शिवाजी नगर येथील भगवान जमाले यांच्या घराच्या लोखंडी चॅनेल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. वाज आल्याने सरस्वती जमाले दार उघडून बाहेर आल्या. यावेळी चोरट्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी गज मारून जखमी केले. आत प्रवेश करून घरातील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. दरम्यान, जमाले यांनी आरडाओरड केल्याने शेजारी जागे झाल्याचे पाहून चोरटे पळून गेले.
यानंतर शिवाजी नगर पासून एक कि.मी. अंतरावर जवळच असलेल्या खंडोबाचा माळ येथील गुंड वस्तीवर चोरटे गेले. येथे अशोक रामभाऊ गुंड यांच्या घराचे दार उघडून आत प्रवेश केला. त्यांना मारहाण करून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवली.
या घटनेत सरस्वती जमाले या गंभीर जखमी असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविले आहे. तर अशोक गुंड हे किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी घटना स्थळी भेट देऊन घटना स्थळाची पहाणी केली. तपासच्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पथक तैनात केले आहेत.