बीड : जिल्ह्यात जवळपास पावणे पाच लाख कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन उपक्रमातून १३६४ गावांत मोठे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व नळजोडण्या पुढील चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे धोरण निश्चित झाले असून, त्याचाच पहिला टप्पा एक लाख नळजोडण्या देऊन पूर्ण केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. जलजीवन मिशन या केंद्र शासनाच्या उपक्रमात जिल्ह्यातील १३६४ गावांमध्ये पिण्याचे पाणी नळाने उपलब्ध करून देण्यासाठीची मोठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील वाडी वस्ती तांडा या ठिकाणीदेखील नळाने पिण्याचे पाणी देण्याचे धोरण आखण्यात आलेले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून जीवन मिशन आराखडे तयार करण्याबाबत स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व आराखडे तयार झालेले आहेत.
अस्तित्वात असलेल्या नळयोजना तसेच ग्रामपंचायतीअंतर्गत कुटुंबांना दिलेल्या नळजोडण्या अधिकृत करून त्यांची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ९ नोंदवहीमध्ये करण्याच्या सूचना यापूर्वीच ग्रामसेवकांना दिले आहेत.
अस्तित्वात असलेल्या नळजोडण्या तसेच अनधिकृत असलेल्या नळजोडण्या अधिकृत करून त्याची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करण्याची मोहीम जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांतर्गत घेण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये एक लक्ष नळजोडणीची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे.
मार्च २०२१ अखेर जिल्ह्यातील अंबाजोगाई व धारूर दोन तालुके १०० टक्के नलजोडणीसाठी उद्दिष्ट म्हणून घेण्यात आले होते. या दोन्ही तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नळजोडणी झालेली आहे, तर उर्वरित गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचे आराखडे तयार झाले असून, या आराखड्याला मंजुरी मिळताच कामे पूर्ण होऊन योजनेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल.
ग्रामीण पाणीपुरवठा पाच उपविभागाचे उपअभियंता तसेच शाखा अभियंता सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, सरपंच यांनी नळजोडणीसाठी विशेष प्रयत्न केले असून आधार कार्ड जोडून ही नळ जोडणी नोंदणी पूर्ण करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या व शाळांना पिण्याच्या पाण्यासाठी वैयक्तिक नळजोडणी देण्याबाबत शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगातून शाळा व अंगणवाड्यांना नळजोडणी दिली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी दिली आहे.
मार्च २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीमध्ये उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचे धोरण ठरलेले असून, पहिल्या वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठाचे उपअभियंता, शाखा अभियंता, ग्रामसेवक यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.