घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

By सोमनाथ खताळ | Updated: May 24, 2025 19:09 IST2025-05-24T19:08:14+5:302025-05-24T19:09:06+5:30

ग्रामीणपेक्षा शहरांमध्ये विवाहिता छळांच्या घटना अधिक

It's suffocating at home! 32 'Vaishnavis' are being harassed every day in the state, more incidents in cities than in rural areas | घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

बीड : सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे, परंतु याच वैष्णवीप्रमाणे दररोज ३२ महिलांचा पती आणि सासरच्या लोकांकडून छळ होत आहे. १ जानेवारी २०२२ ते २२ मे २०२५ या १,२३७ दिवसांत राज्यात तब्बल ३९ हजार ६६५ गुन्हे पोलिस दप्तरी नोंद झाले आहेत. चार भिंतीच्या आत विवाहितांचा दम कोंडत असल्यानेच त्या आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे.

मुंबई, पुणे शहरांत जास्त छळ
विवाहितांचा मुंबई, पुणे या मोठ्या शहरांमध्येच जास्त छळ होत असल्याचे समाेर आले आहे. हा छळ असाह्य होताच, त्यांनी पोलिस ठाणे गाठत सासरच्यांविरोधात तक्रार दिली.

सर्वाधिक गुन्हे कोठे दाखल
मोठ्या शहरांमध्येच विवाहितांचा छळ अधिक होत आहे. यात बृहन्मुंबईत सर्वाधिक ४१२, अहिल्यानगर जिल्ह्यात १९६, बीड २४३, छत्रपती संभाजीनगर २८८, धुळे १८१, जालना १८०, नागपूर १२१, नांदेड १७५, नाशिक २३७, पुणे २२९ या ठिकाणी जास्त गुन्हे दाखल आहेत. ही आकडेवारी १ जानेवारी ते २२ मे २०२५ या दरम्यानची आहे.

कोणत्या कारणांसाठी छळ
घर, प्लॉट, व्यवसाय, वाहन, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, अशा विविध कारणांसाठी विवाहितांचा चार भिंतीत सासरच्या लोकांकडून छळ केला जात आहे. काही घटनांमध्ये तर हुंडा कमी दिला होता, तो आता घेऊन ये, असे म्हणत छळ केला जात आहे.

आधी लव्ह, आता हेट
आकर्षणातून तरुण, तरुणी प्रेमात पडतात. त्यानंतर, कुटुंबाला विश्वासात न घेता प्रेमविवाह करतात, परंतु काही दिवसांतच त्यांचे बिनसते. किरकोळ कारणांवरून खटके उडतात. यातून विवाहिता पोलिस ठाणे गाठत तक्रार देते. असे गुन्हेही अनेक ठाण्यात दाखल आहेत. आगोदर लव्ह आणि आता हेट, अशी अवस्था त्यांची झाली आहे.

भरोसा सेलही कमी पडतो
काही विवाहिता सासरच्यांनी छळ केल्यानंतर भरोसा सेलकडे धाव घेतात. येथे त्यांना वारंवार बोलावून घेत समुपदेशन केले जाते. काही प्रकरणांत तडजोड होते, परंतु काहींत सासरचे लोक नांदविण्यास नकार देतात. अशा वेळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. भरोसा सेलही त्यांच्यापुढे हात जोडतो.

११ महिन्यांत ३,३४३ गुन्हे
१ जूलै २०२४ पासून ते आतापर्यंत अनेक महिलांचा छळ झाला आहे. यातील काहींच्या हाताची तर मेहंदी निघण्याआधीच त्यांचा छळ सुरू झाला होता. मागील ११ महिन्यांत छळाचे ३,३४३ गुन्हे राज्यात नोंद आहेत.

अशी आहे आकडेवारी
वर्षे - गुन्हे

२०२२ -११,९८२
२०२३ - ११,७७०
२०२४ - ११,१७७
२२ मे २०२५ - ४,७३६

Web Title: It's suffocating at home! 32 'Vaishnavis' are being harassed every day in the state, more incidents in cities than in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.