"वडिलांची कौतुकाची थाप नाही याचे दुःख..."; बारावीतील यशानंतर वैभवी देशमुख म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:15 IST2025-05-05T17:12:59+5:302025-05-05T17:15:30+5:30

पित्याच्या हत्येनंतरही धीर न गमावता वैभवी देशमुखने बारावी विज्ञान शाखेत मिळवले घवघवीत यश

"It's sad that I don't have my father's praise on my back..."; Vaibhavi Deshmukh said after her success in 12th... | "वडिलांची कौतुकाची थाप नाही याचे दुःख..."; बारावीतील यशानंतर वैभवी देशमुख म्हणाली...

"वडिलांची कौतुकाची थाप नाही याचे दुःख..."; बारावीतील यशानंतर वैभवी देशमुख म्हणाली...

- मधुकर सिरसट

केज ( बीड) : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर क्रूरपणे हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने, दुःखाचा डोंगर पेलत, बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वडिलांच्या आशीर्वादाने चांगले मार्क मिळाले पण कौतुकाची थाप देण्यासाठी ते नाहीत याचे दुःख कायम राहील, अशी भावना वैभवीने यावेळी व्यक्त केली.

सोमवारी (दि. ५ मे) दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात वैभवीने अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षा देत उज्ज्वल यश प्राप्त केले. आपल्या वडिलांच्या आठवणींना साठवून आणि मनात त्यांच्या स्वप्नांची जपणूक करत वैभवीने हे यश मिळवले.

९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे उमरी शिवारातील टोलनाका परिसरातून अपहरण झाले. काही वेळातच त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी प्रसंगातही वैभवीने मानसिक ताकद दाखवत बारावीची परीक्षा दिली.

वैभवीचे विषयनिहाय गुण 
इंग्रजी: ६३
मराठी: ८३
गणित: ९४
भौतिकशास्त्र: ८३
रसायनशास्त्र: ९१
जीवशास्त्र: ९८
एकूण गुण: ६०० पैकी ५१२ (८५.३३%)

वडिलांची स्वप्नपूर्ती करण्याचा निर्धार
निकालाच्या दिवशी सकाळी वैभवीने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. लोकमतशी बोलताना ती म्हणाली, “वडिलांच्या आशीर्वादानेच माझा निकाल चांगला लागला. त्यांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत. आज त्यांच्या कौतुकाची थाप पाठीवर नाही याचे दुःख मात्र कायम राहील.” नीट परीक्षेचा पेपरही रविवारी झाला. त्याबाबत बोलताना वैभवी म्हणाली की, नीटचा पेपर कठीणच होता. त्यात माझं स्कोअर कमी असेल. पण मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय.

Web Title: "It's sad that I don't have my father's praise on my back..."; Vaibhavi Deshmukh said after her success in 12th...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.