'ऑक्सिजन सुरू करणे आमचे काम नाही'; बीडमध्ये जबाबदारी झटकणाऱ्या दोन नर्स निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 16:58 IST2021-05-23T16:54:40+5:302021-05-23T16:58:14+5:30
सोनाली पवार व दीपांजली काळे असे या निलंबीत केलेल्या नर्सचे नाव आहेत.

'ऑक्सिजन सुरू करणे आमचे काम नाही'; बीडमध्ये जबाबदारी झटकणाऱ्या दोन नर्स निलंबीत
बीड : रूग्णाचा बंद ऑक्सिजन सुरू करण्याची विनंती केल्यानंतर ही आपली जबाबदारी नाही असे सांगत हात झटकणाऱ्या दोन नर्सवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. घटनेनंतर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित असतानाही अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी या नर्सला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला होता. अखेर वरिष्ठांच्या सुचनेनंतर त्यांना जड अंतकरणाने या दोन नर्सला निलंबित करावे लागले.
सोनाली पवार व दीपांजली काळे असे या निलंबीत केलेल्या नर्सचे नाव आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास वॉर्ड क्रमांक सहा मधील रूग्णाचे ऑक्सिजन बंद असल्याने त्याला त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी धाव घेतल्यानंतर ऑक्सिजन लावण्याची विनंती केली होती. यावर कर्तव्यावर असलेल्या नर्सने आपली जबाबदारी झटकून हे काम वॉर्डबॉयचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तात्काळ हा प्रकार जिल्हाधिकारी व आरोग्य विभागातील वरिष्ठांना कळविला. अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूखदेव राठोड यांनी वॉर्डमध्ये येऊन खात्रीही केली. यात त्यांना दोषी असल्याचे दिसले. यावेळी काही माध्यम प्रतिनिधीही सोबत होते.
नातेवाईकांच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी या दोन्ही नर्सला कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतू डॉ.राठोड यांनी 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत कारवाईला दोन दिवस उशिर केला. आगोदर बदली करून त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. नंतर हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आल्यावर त्यांचे निलंबण करण्यात आले. केवळ आर्थिक व्यवहार झालेले असल्याने काही हितचिंतकांच्या दबावापाेटी डॉ.राठोड यांनी कारवाईला उशिर केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
या दोन नर्समुळे केडरची बदनामी
जिल्हा रूग्णालयात सर्वात पुढे होऊन नर्सेस काम करत आहेत. दिवसरात्र आपल्या कुटूंबापासून दुर राहून रूग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्याबद्दल नेहमीच अभिमान राहिलेला आहे. परंतू अशा काही नर्सेसमुळे या केडरची नाहक बदनामी होत आहे. एवढेच नव्हे तर कारवाई टाळण्यासाठी चक्क अख्ख प्रशासन वेठीस धरण्याचा प्रयत्नही केला जातो. उपाेषण, आंदोलनाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
वॉर्ड क्रमांक ६ मधील दोन नर्सवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबचे आदेश डॉ.राठोडकडे आहेत.
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड