महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीत अनियमितता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST2021-08-13T04:37:40+5:302021-08-13T04:37:40+5:30

जिल्हाधिकारी म्हणतात, नियमाप्रमाणेच : तरीही महसूल संघटनेचे निवेदन बीड : जिल्ह्यातील महसूल विभागातील अव्वल कारकून, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, ...

Irregularities in the transfer of revenue staff? | महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीत अनियमितता ?

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीत अनियमितता ?

जिल्हाधिकारी म्हणतात, नियमाप्रमाणेच : तरीही महसूल संघटनेचे निवेदन

बीड : जिल्ह्यातील महसूल विभागातील अव्वल कारकून, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर पदांची बदली प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, या बदली प्रक्रियेवरच महसूल कर्मचारी संघटना गट (क) कडून आक्षेप घेण्यात आले असून, तसे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना देण्यात आले आहे.

महसूल बदल्या या नियमांप्रमाणे झाल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे मत आहे. अनेकांना एकाच ठिकाणी ८ ते १२ वर्षे झालेले आहेत. त्यांच्या बदल्या इतर ठिकाणी करण्यात आल्या आहेत. काही ठराविक कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे, त्यांना विनंती बदलीत संधी दिली जाईल. मात्र, एकाच विभागात, एकाच ठिकाणी व सोयीप्रमाणे बदली हवी असलेल्या काही ठराविक कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण बदली प्रक्रियेवर संशय व्यक्त करणे योग्य नसल्याचे मत जिल्हाधिकारी जगताप यांनी व्यक्त केले.

तर, महसूल संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात बदली प्रक्रियेवर आक्षेप घेत, समुपदेशाने ही बदली प्रक्रिया राबविताना प्रथमत: रिक्त पदांची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना कळविणे आवश्यक होते मात्र, ही माहिती कळविण्यात आली नाही, काही कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी चार किंवा पाच वर्षाच्या कालावधी झालेला असताना त्यांचे मुख्यालयाबाहेर अन्य ठिकाणी बदल्या केल्या आहेत. मात्र, त्यांची गैरसोय होत असल्याचे संघटनेकडून निवेदनात नमूद केले आहे. त्यानुसार फेरविचार करण्याची मागणीदेखील संघटनेकडून करण्यात आली आहे.

काही कर्मचारी एकाच ठिकाणी

काही महसूल कर्मचारी एकाच ठिकाणी व एकाच टेबलावर गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत, अशा क्रिम पोस्टसाठी मोठी लॉबिंग केली जाते. मात्र, त्याठिकाणावरून बदली झाल्यानंतर काही ठराविक कर्मचाऱ्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो मात्र, बदली प्रक्रिया नियमांप्रमाणे झाली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढला

शिपाई ते मंडल अधिकारी, अव्वल कारकून यासह इतर पदांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांचा हास्तक्षेप वाढला आहे. ही परिस्थिती सर्वच प्रशासकीय विभागांत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोची होत असून, नेत्यांच्या मनाप्रमाणे केले नाही तर, विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे.

Web Title: Irregularities in the transfer of revenue staff?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.