जिल्हा रुग्णालयाच्या इलेक्ट्रीक ऑडीटची माहितीच अपडेट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:24+5:302021-01-13T05:27:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा रूग्णालयात फायर ऑडिट तर मागील पाच वर्षांपासून झालेच नाही. परंतु इलेक्ट्रिक ऑडीटची तर ...

जिल्हा रुग्णालयाच्या इलेक्ट्रीक ऑडीटची माहितीच अपडेट नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रूग्णालयात फायर ऑडिट तर मागील पाच वर्षांपासून झालेच नाही. परंतु इलेक्ट्रिक ऑडीटची तर माहितीच अपडेट नसल्याचे समोर आले आहे. भंडारा येथील दुर्घटनेनंतर रूग्णालय प्रशासन गांभीर्याने घेईल, असे वाटले होते. परंतु बीडमधील आरोग्य विभाग या दुर्घटनेनंतरही गाफिलच असल्याचे दिसत आहे. कोणतीही माहिती विचारल्यास अद्याप ते घेणे सुरूच आहे, असे सांगण्यात येत आहे. यावरून आरोग्य विभागाचा कारभार किती गतीने चालतो, याची प्रचिती येते.
जिल्हा रूग्णालयात दररोज हजारो रूग्ण व नातेवाईकांची ये-जा असते. शेकडो रूग्ण शरिक असतात. ज्या वॉर्डमध्ये हे रूग्ण आहेत, तेथील वीज पुरवठा करणाऱ्या वायरची दुरवस्था झाल्याचे दिसते. यामुळे कधीही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ही सर्व परिस्थिती पाहून प्रत्येक वर्षी याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. परंतु यावर्षी तर याचे ऑडिट तर झालेच नाही, परंतु इलेक्ट्रिकल इनस्पेक्शन करणाऱ्या विभागानेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवून अंग झटकले आहे. यावरूनी कोणालाच याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
बोर्ड खराब, वायर लोंबकाळलेले?
जिल्हा रूग्णालयातील विद्यूत पुरवठा कायम या ना त्या कारणाने खंडित होत असतो. त्यातच विद्यूत पुरवठा करणारे वायरही ठिकठिकाणी कटलेले आहेत. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची भीती आहे. अनेक वॉर्डमधील बोर्डही खराब झालेेले आहेत. यापूर्वी अशा खराब वायरींगमुळे कायम अपघाताची भीती असल्याचे कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
ऑडिटकडे सर्वांचेच दुर्लक्ष ?
जिल्हा रूग्णालयात रोज शेकडो रूग्ण उपचार घेत असतात. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाने कशातच गाफिल राहणे धोकादायक असते. प्रत्येक वर्षी फायर व इलेक्ट्रिक ऑडीट करणे गरजेचे असते. परंतु याकडे रूग्णालय प्रशासन आणि विद्यूत विभाग, बांधकाम विभागही दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
फायर ऑडीट २०१५ ला झाले, इलेक्ट्रिकचे सांगू
फायर ऑडिट २०१५ साली झालेले आहे. त्यानंतर झाले नसल्याचे दिसते. इलेक्ट्रिक ऑडिटची माहिती घेणे सुरू आहे. याबाबत संबंधितांना सुचना करून माहिती काढायलाही सांगितले आहे. माहिती आल्यास आपणाला सांगितले जाईल. तसेच शिशु कक्षांचीही माहिती घेणे सुरू आहे.
- डॉ.सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकीत्सक, बीड
तपासणी करण्याचे काम इलेक्ट्रिकल विभागाचेच आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत पत्र द्यायला हवे. त्यानंतर आम्ही याची तपासणी करतो. यावर्षी तरी कोरोनामुळे याची तपासणी झालेली नाही. परंतु यापूर्वी कधी तपासणी झाली, हे कागदपत्रे पाहूनच सांगता येईल. मी सध्या बाहेर असून आमचे निरीक्षक दुसरे आहेत.
- आर.एस.काळे
शाखा अभियंता, बीड
सुविधा तर नाहीतच परंतु आता भितीही वाटत आहे
जिल्हा रूग्णालयात स्वच्छता, पाणी आदी सुविधांसाठी कायम मागणी करावी लागते. स्वता:हून कधीच सुविधा देत नाहीत. आता तर भंडाऱ्याची घटना घडल्यापासून इथे येणेही भितीदायक वाटत आहे. येथील अवस्था खूप बिकट आहे. अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येथे दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- गणपत पांडे
रूग्णाचे नातेवाईक, बीड