तणनाशकाच्या वाढत्या वापरामुळे रोजगार घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:09+5:302021-07-24T04:20:09+5:30
ट्रॅक्टर ने ही आणली अनेकांवर बेरोजगारी अंबेजोगाई : सध्या शेतीच्या कामात तणनाशक मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. याचा ...

तणनाशकाच्या वाढत्या वापरामुळे रोजगार घटला
ट्रॅक्टर ने ही आणली अनेकांवर बेरोजगारी
अंबेजोगाई : सध्या शेतीच्या कामात तणनाशक मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. याचा परिणाम मात्र मजुरांच्या रोजगारावर होत आहे. शेतकरी तणनाशक वापरत असल्या मजुरांना खुरपण्याचे काम नसल्याने अनेक जण रोजगारापासून वंचित राहत आहेत.
पूर्वी बरीच शेतीकामे ही मजुरांच्या मदतीने केली जात होती, परंतु आता शेतात आधुनिक तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. पावसाळ्यामध्ये महिला मजुरांना किमान तीन ते चार महिने शेतातील कामकाजासाठी रोजगार मिळायचा, परंतु कालांतराने पिकातील तणाचे निर्मूलन करण्यासाठी तणनाशक निघाले आणि मजुरांचा रोजगार हिरावल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले. दरवर्षी शेतकरी शेतीची मशागत करतो. बियाणे पेरणी केल्यानंतर उगवण्या झाल्यास, शेतात तणही मोठ्या प्रमाणात उगवले जाते. त्यासाठी खुरपणी मजूर वर्गाकडून केली जात होती, परंतु आता बहुतांश शेतकरी कामे आंतर मशागती मजुरांकडून करून न घेता, तणनाशकाचा सर्रास वापर करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला मजुरांना कामाच्या शोधात रोजगारासाठी भटकंती करावी लागते. तालुक्यातील काही भागांतील अनेक महिला खरीप हंगामातही शेतात कामावर असल्यामुळे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. मात्र, सध्या तणनाशकाचा वापर वाढल्याने, काही मजूर रोजगारापासून वंचित आहेत.
ट्रॅक्टरमुळे ही अनेकांवर बेरोजगारी
शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जात आहे. पूर्वी बैलांच्या आधारावर शेती असल्याने कुळवणी, नांगरणी, मोगडा, पेरणी, रासनी, कोळपणी आदी कामे सातत्याने सुरू राहत असत. या कामासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागत असे. त्यामुळे एकाच शेतकऱ्यांच्या शेतात मजुरांना महिना-महिना काम मिळत असे. मात्र, आता ट्रॅक्टरद्वारेच सर्व कामे अगदी जलद गतीने होऊ लागल्याने अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. परिणामी, मजुरी करणारा वर्ग आता शहराकडे रोजगारासाठी वळला असून, बांधकाम व्यवसायात या लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याने ते पुन्हा शेतीतील कामासाठी गरज पडल्यासही येईनात.