जलशुद्धीकरणासाठी तुरटी, क्लोरिनचे प्रमाण वाढविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:46+5:302021-04-11T04:32:46+5:30
अंबाजोगाई : शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरात पिवळसर रंगाचे पाणीपुरवठा होत असल्याच्या ...

जलशुद्धीकरणासाठी तुरटी, क्लोरिनचे प्रमाण वाढविले
अंबाजोगाई : शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरात पिवळसर रंगाचे पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून, पाण्याचा रंग जाण्यासाठी तुरटी तसेच क्लोरिनचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे, तर शहरात ज्या-ज्या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे. तेथील नळाच्या पाण्याचे नमुने (ओ. टी. टेस्ट) तपासण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले.
अंबाजोगाई शहरातील नळास पिवळसर रंगाचे पाणी येत असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात आल्यामुळे प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मुख्याधिकारी अशोक साबळे, कार्यालयीन अधीक्षक ए. जे. चव्हाण, नगररचनाकार अजय कस्तुरे यांनी ही कारखाना येथील केंद्रावरील जलशुद्धीकरण प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिसभाई अन्सारी, सामाजिक कार्यकर्ते सुनील व्यवहारे, पाणीपुरवठा विभागातील अरुण कुरे, गोस्वामी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
अंबाजोगाई शहरातील १ ते १६ अशा विविध ठिकाणांच्या पाण्याचे नमुने हे बीड येथील मुख्य अणुजीव शास्त्रज्ञ, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविले होते. त्या सर्व ठिकाणचे पाणी नमुने तपासणीनंतर सदरील पाणी हे पिण्यास योग्य असल्याचा अहवाल नगर परिषदेला प्राप्त झाला आहे. तसेच नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दक्षता नगर परिषद घेतली जात आहे. नगर परिषदेकडून केला जाणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य आहे. याबाबत काही शंका अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन मुख्याधिकारी साबळे यांनी केले आहे.
पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा
धनेगाव येथील मांजरा धरण परिसरातील पाणी पातळी दरवर्षी उन्हाळ्यात कमी होत असल्याने पाणी उपसा करणाऱ्या पंपाद्वारे प्रसंगी धरणातील गाळमिश्रित पाणी उपसा होतो. पुढे ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यावर शुद्ध करण्यात येते. पाण्याचा रंग जरी पिवळसर असला तरी या पाण्यावर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून,पाणी पिण्यायोग्य करून ते नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. मात्र, त्यानंतरही प्रक्रिया केलेले पाणी हे काही प्रमाणात पिवळसर रंगाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून वापरावे, असे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या
अंबाजोगाईकरांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य त्या सूचना नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. पाणी गाळून,उकळून,तुरटी फिरवून त्याचा पिवळसरपणा घालवू शकतो. नगर परिषद प्रशासन जनतेला शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.
-राजकिशोर मोदी, प्रभारी नगराध्यक्ष, नगर परिषद,अंबाजोगाई
===Photopath===
100421\10bed_15_10042021_14.jpg