परळीत वडसावित्री तलावातून दारुचे बेकायदेशीर उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:30 IST2018-02-24T00:27:13+5:302018-02-24T00:30:26+5:30
परळी तालुक्यातील वडसावित्री, वसंतनगर, धारावती येथे गावठी हातभट्टीचा पूर वाहतच आहे. येथे नवसागर, निकृष्ट दर्जाचा गूळ वापरुन वर्षानुवर्षे हातभट्टी दारूचे उत्पादन चालू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागासह परळी ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे काम सर्रास सुरू आहे.

परळीत वडसावित्री तलावातून दारुचे बेकायदेशीर उत्पादन
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यातील वडसावित्री, वसंतनगर, धारावती येथे गावठी हातभट्टीचा पूर वाहतच आहे. येथे नवसागर, निकृष्ट दर्जाचा गूळ वापरुन वर्षानुवर्षे हातभट्टी दारूचे उत्पादन चालू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागासह परळी ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे काम सर्रास सुरू आहे.
परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अनेक गावात गावठी हातभट्टीची दारू विक्री जोरात सुरू आहे. धारावती, वसंतनगर, वडसावित्री नगर परिसरात दारूच्या भट्ट्या उघडपणे चालू आहेत. या ठिकाणी अनाधिकृत, बेकायदेशीर उत्पादित होत असलेली हातभट्टी दारू शहर व परिसरात पुरविली जाते. या दारूपायी अनेकांचा जीवही गेला आहे. या दारूची बाहेरही विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश भिसे व प्रा. अतुल दुबे यांनी केला आहे. तर गावठी दारूची निर्मिती व विक्री न थांबल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे अतुल दुबे यांनी दिला आहे.
धारावती तांडा येथील बेकायदेशीर गावठी दारूचे उत्पादन बंद करावे, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई राठोड यांनी वेळोवेळी संघर्ष केला. पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी यांचे दरवाजे ठोठावले. ग्रामीण पोलिसांना निवेदन दिले. अनेक वर्षे लढा देवूनही धारावती तांडा येथे गावठी दारूचा पूर वाहतच असल्याचे दिसून येते.
संबंधितावर कडक कारवाई
परळी तालुक्यातील धारावती तांडा येथील बेकायदेशीर व अनधिकृतपणे चालू असलेले दारूचे उत्पादन बंद करण्यात येईल व संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.
- हर्षवर्धन गवळी,
पोलीस निरीक्षक, परळी ग्रामीण ठाणे