बीडमध्ये अवैध प्रवासी वाहतूक;धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:47+5:302021-03-10T04:33:47+5:30
बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागांत सध्या खासगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक ...

बीडमध्ये अवैध प्रवासी वाहतूक;धोका वाढला
बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागांत सध्या खासगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीला नियंत्रित करण्याची मागणी आहे.
नेकनूर-पोथरा
रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. म्हणून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या संदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देऊन दुरूस्तीची मागणी होत आहे.
सिग्नल बंद अवस्थेत
बीड : शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था सुरू करण्याची मागणी नागरिकातून होती, परंतु दुरूस्ती झालेली नाही.
कामे होईनात
गेवराई : तालुक्यातील अनेक ठिकाणच्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणच्या इमारती अनेक महिन्यापासून धूळ खात असून महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. सज्जावर तलाठी राहत नसल्याने कामे होईनासे झाले आहे.
सूचनांकडे दुर्लक्ष
सिरसाळा : सिरसाळा व परिसरातील नागरिकांचा रोज परळीशी संपर्क असतो. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन आवश्यकता नसेल तर परळीला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीदेखील नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे.
दारू विक्री बंद करा
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारुबंदीची मागणी महिलांनी केली आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
डासांचे प्रमाण वाढले
अंबाजोगाई : शहर व नव्याने विकसित होत असलेल्या सिल्वरसिटी परिसरात अद्याप नाल्याचे बांधकाम न झाल्याने पाण्याचे डोह साचल्याने डास झाले आहेत. यामुळे त्रास आहे.