कीर्तनास आलेल्या पत्नीस पतीची मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या दोघांवरही केला धारदार शस्त्राने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 18:46 IST2021-07-07T18:45:18+5:302021-07-07T18:46:38+5:30
कीर्तनाच्या ठिकाणी कशाला शिवीगाळ करता असे समजून सांगत मध्यस्थी करणाऱ्या दोघांवर धारदार शस्त्राने केले वार

कीर्तनास आलेल्या पत्नीस पतीची मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या दोघांवरही केला धारदार शस्त्राने वार
परळी ( बीड ) : 'कोणाला विचारून किर्तनाला आलीस ?' असे म्हणून पत्नीला पतीने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. कीर्तन कार्यक्रमस्थळी धारदार शस्त्र घेवून आलेल्या त्या व्यक्तीस रोखण्याचा प्रयत्न करताना सरपंच पतीस व अन्य एकास मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी मालेवाडी येथील माणिक कुंडलिक बदने ( रा. मालेवाडी ) याच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीस पोलिसांनी अटक करून शस्त्र जप्त केले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, परळीपासून सात किलोमीटर अंतरावरील मालेवाडी या गावात ६ जुलै रोजी दुपारी तीनच्या दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. गावातील बरेच जण उपस्थित होते. या कार्यक्रमास एक महिला ही कीर्तन ऐकण्यासाठी बसलेली होती. तेव्हा तेथे महिलेचा पती माणिक बदने आला. 'तू कोणाला विचारून कीर्तनास आलीस', असे विचारून त्याने पत्नीस शिवीगाळ केली. दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, कीर्तनाच्या ठिकाणी कशाला शिवीगाळ करता असे समजून सांगत असताना सुदाम आंधळे आणि मालेवाडीच्या सरपंच यांचे पती भुराज बदने यांना धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. यात भूराज बदने हे जखमी झाले असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पात माणिक कुंडलिक बदने याच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सपोनी मारोतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज जीरगे हे तपास करीत आहेत.