बीड : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एआयसीटीई अभ्यासक्रमाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी गणित व भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याची तरतूद नियमावलीत केली आहे. अभियांत्रिकीची भीती दूर होण्यासाठी व प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषय बंधनकारक होते. मात्र, आता एआयसीटीईच्या या निर्णयाबद्दल तज्ज्ञांमधून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, काॅम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलाॅजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस, बायोटेक्नॉलाॅजी, टेक्निकल व्होकेशनल, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स बिझनेस स्टडीज, आंत्रप्रेनरशिप यापैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होऊन या तीन विषयांत एकत्रित ४५ टक्के गुण आवश्यक केले आहेत. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक पालकांनी स्वागत केले. मात्र, काही पालकांनी होणारा अभियंता खरंच कौशल्य शिकलेला असेल का, असा प्रश्न उपस्थित करीत शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय आता सक्तीचे नाहीत आणि जर हे विषय बारावीला घेतले नसतील तर अभियंत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकावे लागणार आहेत. या विषयात जर विद्यार्थी कमी पडत असेल तर अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात त्याची तयारीही करून घेतली जाणार आहे. यालाच ब्रिज कोर्स असे म्हटले आहे. यामुळे हे विषय न घेता विद्यार्थी अभियांत्रिकी शिकणार, असे मुळीच होणार नाही, ते शिकावेच लागणार आहेत.
निर्णय योग्य
यापूर्वी एखाद्या विद्यार्थ्याने चुकून बारावीला जर भौतिकशास्त्र, गणित हे विषय नसतील तर त्या विद्यार्थ्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेता येत नव्हते; परंतु या निर्णयामुळे बारावीला हे विषय घेतले नसतील तरीही त्याला अभियांत्रिकीत प्रवेश मिळू शकेल व अभियांत्रिकीची पदवी पूर्ण करता येऊ शकेल. एकंदरीत हा निर्णय योग्य व स्वागतार्ह आहे.
-प्रा.राहुल खडके, प्राचार्य, आदित्य पॉलिटेक्निक, बीड.
--------
निर्णय अयोग्य
इंजिनिअरिंगसाठी पीसीएम कम्पलसरी आहे, तसेच एआयसीटीई प्रत्येक विद्यापीठाला स्वायत्तता दिली आहे. या निर्णयानुसार इतर क्षेत्रांसाठी हा पर्याय आहे. मात्र, पीसीएम करावेच लागणार. जेईई, सीईटी पीसीएम ग्रुपवर आधारितच होणार आहे. अभियांत्रिकीत मॅथचा बेस आवश्यक असतो. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषय बंधनकारक नसल्याचा निर्णय अयोग्य वाटतो. - हर्षल केकान, तज्ज्ञ
------
भौतिकशास्त्र आवश्यकच
एआयसीटीईचा निर्णय अयोग्य आहे. संगणक शिक्षण घेणाऱ्यांसाठी योग्य आहे; परंतु इतर शाखांसाठी आयोग्य आहे. अभियांत्रिकी शिक्षणात प्रत्येक ठिकाणी भौतिकशास्त्र, गणिताची आवश्यकता आहे. मेजरमेंटशिवाय निर्णयाप्रत जाऊच शकत नाही. अभियांत्रिकी शिकायचे असेल तर भौतिकशास्त्र तर आवश्यकच आहे. - प्रा. बी. एम. नफ्ते, तज्ज्ञ
---
शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम
एआयसीटीईच्या निर्णयामुळे प्रवेश संख्या वाढून रिक्त जागा भरल्या जातील. मात्र, गणित व भौतिकशास्त्र हे विषय इंजिनिअरिंग प्रवेशासाठी गाभा समजले जातात. आधीच या शिक्षणातून बेरोजगार अभियंत्यांचे प्रमाण वाढले आहे. हे पदवीधर रोजगाराला पात्र नसल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले. मग आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषय बंधनकारक नसतील, तर शिकणारी पिढी रोजगारक्षम बनणार काय, गणितीय ज्ञानकौशल्य नसेल तर त्याचा फायदा काय, केवळ जागा रिक्त आहेत म्हणून त्या भरून काढण्यासाठीचा हा निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
--------
बीड जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये - ०३
एकूण जागा-९६०
रिक्त जागा-५५३
----