- पुरुषोत्तम करवामाजलगाव ( बीड) : राज्य शासनाच्या सन २०२२ च्या साठाव्या चित्रपट पुरस्कारासाठीच्या नामांकनांची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी रोजी घोषणा केली. यात मराठवाड्याच्या मातीतील निर्मिती असलेला बहुचर्चित 'ग्लोबल आडगाव' या चित्रपटात चार नामांकने मिळाली. विशेष म्हणजे, माजलगावचे भूमिपुत्र अनिलकुमार साळवे यांना या चित्रपटाच्या कथेसाठी नामांकन मिळाले आहे. 'ग्लोबल आडगाव' चित्रपटाला एकूण एकूण चार नामांकने मिळाल्याने चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मराठवाड्याला पहिल्यांदाच मोठा बहुमान मिळाला आहे.
'ग्लोबल आडगाव' या सिनेमांमधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशनच्या विळख्यात अडकलेला शेतकरी, ग्लोबलायझेशन मुळे शेतीचे झालेले नुकसान अशा महत्त्वाच्या विषयावर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलेले आहे. सन २०२२ या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी ग्लोबल आडगावची निवड झाली. तर या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अनिल कुमार साळवे यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी नामांकन प्राप्त झाले.
अशी आहेत नामांकने: सर्वोत्कृष्ट चित्रपट (ग्लोबल आडगाव), सर्वोत्कृष्ट कथा : डॉ. अनिलकुमार साळवे (ग्लोबल आडगाव), उत्कृष्ट गीते : प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे - यल्गार होऊ दे), उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव) अशा चार विभागात ग्लोबल आडगाव चित्रपटास नामांकने मिळाली आहेत.
यापूर्वी ग्लोबल आडगाव या मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित आणि डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित मराठी चित्रपटास न्यू जर्सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल अमेरिका सन्मान, न्यूलीन लंडन बेस्ट रायटर अवॉर्ड, इफ़फी गोवा महोत्सवात महाराष्ट्र शासनाकडून निवड, कोलकाता फिल्म फेस्टिव्हल, अजंता-एलोरा फिल्म फेस्टिव्हल, पीफ फेस्टिव्हल, यशवंत फेस्टिव्हल मध्ये निवड होऊन अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. ग्लोबल आडगाव हा बहुचर्चित चित्रपट लवकरच अमेरिका दुबईसह महाराष्ट्रात रुपेरी परद्यावर झळकणार आहे.
सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी,उपेंद्र लिमये, अनिल नगरकर,रौनक लांडगे,सिद्धी काळे,अशोक कानगुडे,अनिल राठोड,महेंद्र खिल्लारे,साहेबराव पाटील,डॉ. संजीवनी साळवे,डॉ. सिद्धार्थ तायडे, रानबा गायकवाड ,जितेंद्र शिरसाठ,विद्या जोशी,विष्णू भारती, डॉ. दिलीप वाघ,प्रदीप सोळंके,मधुकर कर्डक,नाना कर्डीले,व्यंकटेश कदम,फुलचंद नागटिळक,रामनाथ कातोरे,रणधीर,मोरे, सचिन गेवराईकर,आदित्य जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन,विष्णू चौधरी,माजिद खान, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, ऋषिकेश आवाड मंगेश तुसे, आशीर्वाद नवघरे यांच्यासह अनेक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. तर डॉ. विनायक पवार, प्रशांत मडपुवार, डॉ. अनिलकुमार साळवे यांचे गीत लेखन असून जसराज जोशी, डॉ. गणेश चंदनशिवे, आदर्श शिंदे यांनी पार्श्वगायन केले आहे. संगीतकार विजय गावंडे यांनी गाणी संगीतबद्ध केली आहेत. सिनेमॅटोग्राफी गिरीश जांभळीकर ,संकलन श्रीकांत चौधरी, ध्वनी आयोजन विकास खंदारे,निर्मिती व्यवस्था प्रशांत जठार, सागर पतंगे,कला दिग्दर्शन संदीप इनामके आदींनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे. गणेश नारायण, डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.