राज्यातील २,१६४ बालकांचे हृदय आजारी; दोन कोटी मुलांच्या आरोग्य तपासणीत निष्पन्न

By सोमनाथ खताळ | Updated: January 21, 2025 19:53 IST2025-01-21T19:52:39+5:302025-01-21T19:53:59+5:30

मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मत: असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट आरबीएसकेमध्ये आहे.

Health check-up of two crore children in the state; 2,164 children have heart disease | राज्यातील २,१६४ बालकांचे हृदय आजारी; दोन कोटी मुलांच्या आरोग्य तपासणीत निष्पन्न

राज्यातील २,१६४ बालकांचे हृदय आजारी; दोन कोटी मुलांच्या आरोग्य तपासणीत निष्पन्न

बीड : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यातील ० ते १८ वयोगटातील जवळपास दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये २,१६४ मुलांचे हृदय आजारी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच दातांसह इतर आजार असणाऱ्या २२ हजार २७६ शस्त्रक्रिया केल्या आहेत. हा आकडा एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील आहे.

मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मत: असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट आरबीएसकेमध्ये आहे. या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालणे हा मुख्य उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील जवळपास २ कोटी मुलांना होत आहे. अंगणवाडीस्तरावर ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांची वर्षातून २ वेळा तपासणी होते. ६ ते १८ वयोगटातील मुलांनाही याचा लाभ होतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा ताई किंवा आरोग्यसेविका, आरोग्य केंद्रात संपर्क करू शकता.

१,१९६ पथके
राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत एकूण १,१९६ पथके मंजूर करण्यात आलेली आहेत. प्रत्येक पथकात १ वाहन, २ वैद्यकीय अधिकारी, १ औषधी निर्माण अधिकारी, १ एएनएम, तपासणी साहित्य इत्यादी पुरविण्यात आलेले आहे.

१०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया
या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया या पूर्णतः मोफत करण्यात येतात. यामध्ये हृदय शस्त्रक्रियेसह इतरांचा समावेश आहे. १०४ पैकी ५२ शस्त्रक्रियांचा समावेश महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये होतो. तर उर्वरित ५२ शस्त्रक्रियांमध्ये ३१ प्रकारच्या दातांच्या विकारांचा समावेश होतो. या शस्त्रक्रिया आरबीएसके अंतर्गत अंगीकृत झालेल्या राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६० हून अधिक रुग्णालयांमध्ये मोफत करण्यात येतात.

सर्व उपचार मोफत
आरबीएसके कार्यक्रम सामान्यांसाठी संजीवणी ठरू पाहात आहे. हृदयासह इतर गंभीर व साध्या शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य संस्था किंवा अंगीकृत रुग्णालयांमध्ये केल्या जातात. हे सर्व उपचार मोफत असतात. बीडमधील कामही चांगले आहे.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

आकडेवारी काय सांगते?
फेज १ (एप्रिल ते सप्टेंबर २०२४) मध्ये एकूण १ लाख १० हजार १७१ इतक्या अंगणवाडींची आणि एकूण ६७ लाख ६१ हजार ७७६ बालकांची तपासणी केली आहे.
फेज २ (ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४) मध्ये एकूण ५१ हजार ४५ इतक्या अंगणवाडींची आणि एकूण ३० लाख ४६ हजार ६४ बालकांची तपासणी केली आहे.
एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ अखेर एकूण ७० हजार ६८० इतक्या शाळांची तपासणी करून एकूण ९८ लाख ७९ हजार ४२ इतक्या मुलांची तपासणी झाली आहे.

Web Title: Health check-up of two crore children in the state; 2,164 children have heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.