पत्नीवर आधी ब्लेडने वार, नंतर दाबला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST2021-09-15T04:38:55+5:302021-09-15T04:38:55+5:30

बीड : तालुक्यातील आहेर वडगाव येथे कौटुंबिक वादातून पती, सासू आणि सासरा यांनी कट रचून झोपेत असलेल्या विवाहितेवर ब्लेडने ...

He stabbed his wife first with a blade, then pressed her throat | पत्नीवर आधी ब्लेडने वार, नंतर दाबला गळा

पत्नीवर आधी ब्लेडने वार, नंतर दाबला गळा

बीड : तालुक्यातील आहेर वडगाव येथे कौटुंबिक वादातून पती, सासू आणि सासरा यांनी कट रचून झोपेत असलेल्या विवाहितेवर ब्लेडने वार केले. त्यानंतर जखमी झालेल्या विवाहितेचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिन्ही आरोपींवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

सविता भागुजी रोहिटे (वय २५, रा. आहेर वडगाव) असे त्या विवाहितेचे नाव आहे. सविता यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.०९) रात्री पती आणि सासूने जुने घरगुती वाद उकरून काढून तिला शिवीगाळ सुरू केली. वाद वाढवायचा नसल्याने १० वा. ती खोलीत जाऊन झोपली. मध्यरात्री झोपेत असताना पती भागुजी सुरेश रोहिटे याने दाढीच्या ब्लेडने तिच्या कपाळावर वार केला. मार लागल्याची जाणीव झाल्याने सविता उठली आणि जाब विचारला. तेव्हा त्याने ब्लेड फेकून देत तुला जीवेच मारतो म्हणत तिचा गळा दाबला. सविताने कशीबशी स्वतःची सुटका करून घेताच पती, सासरा सुरेश देवराव रोहिटे आणि सासू कुशीवार्ता या तिघांनी तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने केसाला धरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने ती बेशुद्ध झाली. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ अन्वये बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आवारे करत आहेत.

Web Title: He stabbed his wife first with a blade, then pressed her throat