'तो' ललीतकुमार माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 13:17 IST2018-06-19T13:17:34+5:302018-06-19T13:17:34+5:30
शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ललिता या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

'तो' ललीतकुमार माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रुजू
माजलगांव (बीड ) : शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ललिता या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. यानंतर आज सकाळी 'ललितकुमार' हे शहर पोलिस ठाण्यात पुरुष कर्मचारी म्हणून कर्तव्यावर रूजू झाले.
तालुक्यातील राजेगांव येथील ललिता 2010 मध्ये महिला कर्मचारी म्हणून पोलिस खात्यात रूजू झाल्या. त्या मागील तिन वर्षांपासुन शहर पोलिसात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःमधील शारीरिक बदलांमुळे लिंगबद्दल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अशी शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. तसेच त्यानंतर पुरुष पोलीस कर्मचारी म्हणून सेवेत घेण्याचे निश्चित केले.
ललिता यांचे शस्त्रक्रियेनंतर 'ललितकुमार' म्हणून काही दिवसांपूर्वी गावात आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर आज सकाळी ललितकुमार हे माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रूजु झाले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजीव तळेकर उपस्थित होते.