‘Happy hypoxia’ is fatal; 70% of patients die within 48 to 72 hours | 'हॅप्पी हायपोक्झिया' घातकच; ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ४८ ते ७२ तासांच्या आत

'हॅप्पी हायपोक्झिया' घातकच; ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ४८ ते ७२ तासांच्या आत

ठळक मुद्देरूग्णांनी लक्षणे जाणवताच उपचारासाठी यावे

अंबाजोगाई : कोरोनामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ४८ ते ७२ तासांच्या आत मृत होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी कोरोनाची लक्षणे दिसू लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हीड केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड केअर हॉस्पिटलमध्ये ४ जून २०२० रोजी कोवीडचा पहिला रूग्ण आला. या रूग्णापाठोपाठ ट्रेसिंग दरम्यान त्याच्या कुटुंबातील इतर चार सदस्य पॉझिटीव्ह निघाले. आणि ही साखळी सतत वाढत गेली. हा पहिला रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक बरे होवून घरी गेले असले याचे समाधान असले तरी नंतर वाढत जाणारा मृत्युदर हा काळजी वाढवणारा आहे. मुळात कोरोना या आजाराबद्दल लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत,ही खंत आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागताच उपचारासाठी आलेले शेकडो रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. कोरोनामुळे उपचारासाठी येणा-या रूग्णांमध्ये पहिल्या ४८ ते ७२ तासात होणार्‍या मृत्यूचे दर ७० टक्केच्या आसपास आहे, असे निरीक्षण स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख तथा कोव्हीड केअर केंद्राचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी नोंदवले आहे. 

"हॅप्पी हायपोक्झिया".मुळे रुग्ण होतात गंभीर 
या संदर्भात बोलताना डॉ.बिराजदार पुढे म्हणाले की, कोरोनाच्या भितीमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतो. यामुळे मनात एक भीती निर्माण होऊन रूग्ण स्वतः आजार कोणालाही न सांगता अंगावर काढतो. जेव्हा आजार वाढतो,तेव्हा आपल्या फुप्फुसाचा ५० ते ७० टक्के भाग हा संक्रमित झालेला असतो. तेव्हा ऑक्सीजनचा पुरवठा करणे सुद्धा अवघड होते. या आजाराचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे "हॅप्पी हायपोक्झिया".या प्रकारात शरीरातील ऑक्सीजनची पातळी कमी होऊन सुद्धा ज्या प्रमाणात दम, लागायला पाहिजे तो लागत नसल्याने रूग्णांना आपल्या आजाराचा गंभीरपणा लक्षात येत नाही. म्हणून रूग्ण उपचारासाठी उशिरा येतो व त्याचा परिणाम त्याच्यावर उपचार करणं खुपचं अवघड होतं. हे सर्व टाळण्यासाठी  कुटुंबातील सर्व वयस्कर व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक घरी पल्स ऑक्सीमिटर हे छोटेसे यंत्र असणे गरजेचे असून त्यादृष्टीने सर्दी, खोकला, ताप आलेल्या रूग्णांचे ऑक्सीजनची पातळी तपासून, वेळीच उपचार सुरू केले तर चांगले परिणाम दिसून येतील. 

मानसिक कणखरता महत्वाची 
या आजारात मानसिक संतुलन राखू्न ठेवणे हे ही खुपच गरजेचे आहे. हा आजार असतांनाही अनामिक भितीने अनेक लोक रूग्णालयात येण्यास खुप उशीर करतात. किंबहुना अत्यंत अस्वस्थ झाल्यानंतरच हे रूग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये ७० वर्षांपुढील उच्च रक्तदाब, मधुमेह, न्युमोनिया, श्वसनाचे आजार व इतर आजार असणा-यांची संख्या खुप मोठी आहे. या रुग्णांच्या इतर सर्व टेस्ट करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेळ जातो आणि परिणामी असे रूग्ण बारा ते चोवीस तासाच्या आतच दगावतात. कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचा मृत्युदर त्या मानाने खुप कमी आहे असे रूग्ण औषधोपचारासोबत मानसिक समुपदेशानेही लवकर बरे होतात असा अनुभव आहे. मुळात कोरोना रुग्णांना घरातील लोकांनी व समाजातील लोकांनी त्याचे मानसिक बळ वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. ते फार कमी प्रमाणात होते असे दिसते. कोरोना विरूध्दचा लढा हा केवळ रूग्ण आणि डॉक्टर यांचाच नाही तर समाजातील सर्व घटकांचा आहे. सर्वांनी शासनाने लागू केलेले सर्व निर्बंध पाळत या लढ्यात सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी केले आहे.

Web Title: ‘Happy hypoxia’ is fatal; 70% of patients die within 48 to 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.