पोलीस कर्मचाऱ्यांचे चांगले काम प्रशासनाची मान उंचावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:32 IST2021-02-07T04:32:00+5:302021-02-07T04:32:00+5:30
बीड : विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून सुरू असलेल्या वार्षिक तपासणीचा ६ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस होता. पोलीस महानिरीक्षक के.एम. ...

पोलीस कर्मचाऱ्यांचे चांगले काम प्रशासनाची मान उंचावते
बीड : विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून सुरू असलेल्या वार्षिक तपासणीचा ६ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस होता. पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी शनिवारी दुपारी गुन्हे आढावा बैठक घेऊन विविध प्रकारच्या सूचना केल्या. मागील चार महिन्यांत सर्वाधिक प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा केल्याबद्दल बीड पोलिसांचे कौतुकदेखील केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामांमुळे पोलीस प्रशासनाची मान उंचावते त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचनासुद्धा दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, स्वाती भोर यांच्यासह सर्व विभागाचे उपाधीक्षक, ठाणेप्रमुख व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वार्षिक तपासणीसाठी १ फेब्रुवारीपासून विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना हे जिल्ह्यात तळ ठोकून होते. या काळात त्यांनी गेवराई, मजलगाव, परळी, केज या ठाण्यांना भेटी देऊन तपासणी केली. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्र, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा यांचीदेखील पाहणी केली. शनिवारी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी अधीक्षक कार्यालयात गुन्हे आढावा बैठक घेतली. यावेळी सप्टेंबर अखेरपर्यंत ५ हजार १९ गुन्हे प्रलंबित होते. त्यापैकी ५ हजार १२५ गुन्ह्याचा निपटारा मगील चार महिन्यांत करण्यात आला. त्यामुळे बीड पोलिसांचे कौतुक त्यांनी केले. तसेच पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रश्न समजावून घेत योग्य ती कार्यवाही केली. तसेच पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांना चांगली वागणूक द्यावी, गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया कराव्यात, तसेच गस्त वाढवावी, उपाधीक्षकांनी ठाण्यांना नियमित भेटी देऊन आढावा घ्यावा, महिलांच्या संदर्भातील गुन्हे तातडीने मार्गी लावावेत, असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दिले आहेत.
सर्व ठाण्यांना एकच रंग
नागरिकांना पोलीस ठाण्याकडे पाहिल्यानंतर भीतिदायक वाटू नये असा रंग सर्व ठाण्यांना देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी आग्रही राहून कामाकडे लक्ष द्यावे, या सूचना विशेष पोलीस महानिरीक्षकांनी उपस्थिातांना केल्या.