गोव्याची दारू बाटलीत भरून बारमध्ये विक्री; लाखोंचा मुद्देमाल जप्त

By अनिल भंडारी | Published: January 6, 2024 06:06 PM2024-01-06T18:06:30+5:302024-01-06T18:10:01+5:30

येळंबघाटमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Goa liquor bottled and sold in bars; Assets worth lakhs seized | गोव्याची दारू बाटलीत भरून बारमध्ये विक्री; लाखोंचा मुद्देमाल जप्त

गोव्याची दारू बाटलीत भरून बारमध्ये विक्री; लाखोंचा मुद्देमाल जप्त

बीड : गोवा राज्य बनावटीची व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली दारू चक्क परमिट रूम बीअर बारमध्येच बाटल्यांत भरून विक्री करण्याच्या गोरखधंद्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत बाटल्या व बुचे आणि अवैध दारू असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ५ जानेवारी रोजी बीड तालुक्यातील येळंबघाट परिसरात करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्कचे बीड येथील अधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ५ जानेवारी रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुक्यातील येळंबघाट गावाच्या हद्दीत हॉटेल समृद्धी बीअर बार व परमिट रूम येथे अचानक छापा मारला. यावेळी गोवा राज्य बनावटीची व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली दारू पुन्हा बाटलीत भरून विक्री करताना निदर्शनास आले.

या कारवाईच्या वेळी मालक नीलेश कांतराव ढाकणे हा त्याच्या परमिट रूम व बारच्या आवारात गोवा बनावटीची व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली दारू दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरून विकण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक अभय औटे, उपनिरीक्षक व्ही. डी. आगळे, ए. एस. नायबळ, अरुण खाडे, जवान बी. के. पाटील, एस. ए. सांगुळे, एस. व्ही. धस, एन. बी. मोरे, आर. एम. गोणारे, पी. पी. मस्के, के. एन. डुकरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या गुन्ह्याचा तपास भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक अभय औटे करीत आहेत.

तर कायमचा परवाना रद्दची कारवाई
संबंधित परवानाधारक बारमालकावर रितसर कारवाई करून विभागीय विसंगतीचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. अनुज्ञप्तीधारकांच्या परमिट रूम, बारमध्ये असे गुन्हे आढळल्यास त्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. - विश्वजीत देशमुख, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बीड.

Web Title: Goa liquor bottled and sold in bars; Assets worth lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.