'शेतीला 'सकस' करणाऱ्याचा गौरव'; अण्णासाहेब जगताप यांना शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 15:14 IST2021-04-01T15:10:20+5:302021-04-01T15:14:20+5:30
Farmer Award माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतशील व प्रयोगशिल शेतकऱ्याचा 2019 चा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरव

'शेतीला 'सकस' करणाऱ्याचा गौरव'; अण्णासाहेब जगताप यांना शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर
माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब अर्जुनराव जगताप यांना 2019 चा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने बुधवारी घोषणा केली. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून विविध प्रयोग करून जमिनीला 'सकस' करण्याच्या त्यांच्या कामगिरीचा हा शासनाने केलेला गौरव ठरला आहे. मागील दहा वर्षांपासून अण्णासाहेब जगताप सेंद्रिय शेतीचा एकनिष्ठेने प्रसार आणि प्रचार करत आहेत.
राज्यात कृषी, कृषी संलग्न क्षेत्र आणि फलोत्पादन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2018- 19 या वर्षांकरिता कृषी पुरस्कारांची घोषणा कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 31 मार्च रोजी केली आहे. यात माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब अर्जुनराव जगताप यांना 2019 चा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. अण्णासाहेब हे सेंद्रिय शेतीचा मागील १० वर्षांपासून प्रसार आणि प्रचार करत आहेत. त्यांचे यु ट्यूब वर 'दिशा सेंद्रिय शेती' असे चॅनलसुद्धा आहे. यावरून ते सेंदीय शेतीच्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवतात. या पुरस्कारामुळे अण्णासाहेब जगताप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
न डगमगता प्रयोग करत राहिलो
सेंद्रिय भाज्यांचा माणसांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. तसेच परिणाम सेंद्रिय शेती केल्याने जमिनीवर होतात. विषमुक्त पिके जोमाने येतात आणि साहजिकच त्यांची पौष्टिकता वाढते. सुरुवातीला सेंद्रिय शेती करताना अनेक अडचणी आल्या. परंतु, न डगमगता मी माझ्या प्रयोगांवर ठाम राहिलो. गावातील इतर शेतकरी सुरुवातीला हिणवायचे आता मदतीला तत्पर असतात. सध्या माझ्याकडे भाज्या, गाजर, धान्य यांची विविध प्रकारची गावरान ६० बियाणे आहेत. या बियाणांना गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक येथून मोठी मागणी आहे. हा व्यवसाय नाही मात्र सेंद्रिय शेतीचा प्रसार व्हावा हाच उद्धेश आहे. पुढच्या पिढीवर नापिकी जमिनीचे मोठे संकट येणाऱ्या काळात उद्भवणार आहे. त्यावर मात करायची आहे.
- अण्णासाहेब जगताप, शेतकरी