'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू'; विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 21:58 IST2021-11-26T21:57:33+5:302021-11-26T21:58:43+5:30
संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू'; विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ
परळी: आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे.मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन,( Vaidyanath temple will be blown up by RDX ) अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीच्या पत्राने २६ नोव्हेंबर रोजी एकच खळबळ उडाली. संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येतात. मार्च २०२० पासून हे मंदिर कोविडमुळे बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वी मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले.
सध्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा.काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले आहे.