दुचाकी चोरांची टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:34+5:302021-07-11T04:23:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दिंद्रुड : गेल्या काही दिवसांपासून दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. या ...

दुचाकी चोरांची टोळी पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंद्रुड : गेल्या काही दिवसांपासून दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. या घटना दिंद्रुड पोलिसांसाठी आव्हान ठरत होत्या. शुक्रवारी रात्री दिंद्रुड पोलिसांनी दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली आहे. दोघांना अटक करून त्यांच्याकडून दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.
नितीन वसंत मुंडे (रा. पहाडी दहिफळ, ता. धारूर), गणेश काशीनाथ गायकवाड (रा. हनुमाननगर, पाथरी, जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी ही कारवाई केली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी तेलगाव येथील एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. या घटनेची दिंद्रुड पोलिसांनी गंभीरतेने दखल घेऊन काही तासांत दुचाकीचोरास दुचाकीसह अटक केली. सदर दुचाकीचोरास अटक करून दिंद्रुड पोलीस ठाण्यात आणले. त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार वडवणी येथून शुक्रवारी अन्य एका आरोपीलाही अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याच्याकडे चौकशी करून त्याने दिलेल्या माहितीनुसार विशेष पथकाची नियुक्ती केली. रात्रीतूनच वडवणी येथून १, पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतून ३, सोनीमोहा येथून २, अंबाजोगाई हद्दीतून १, रायमोहा येथून २ व अन्य एक अशा तब्बल दहा दुचाकी जप्त केल्या. या कारवाईत प्रभा पुंडगे यांच्यासह त्यांचे सहकारी फौजदार विठ्ठल शिंदे व अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड, संजय मुंडे यांचा समावेश होता.
....
बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. आम्ही याचा कसून तपास करून या रॅकेटचा पर्दाफाश करू.
- प्रभा पुंडगे, सहायक पोलीस निरीक्षक, दिंद्रुड पोलीस ठाणे.