धुळे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड; दरोडा-जबरी चोरीचे ४ गुन्हे उघड!
By सोमनाथ खताळ | Updated: December 13, 2025 11:37 IST2025-12-13T11:32:16+5:302025-12-13T11:37:25+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; धाराशिव जिल्ह्यातील तिघे अटकेत

धुळे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड; दरोडा-जबरी चोरीचे ४ गुन्हे उघड!
बीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांची वाहने अडवून, काचा फोडून शस्त्राचा धाक दाखवून दरोडा आणि जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीला बीड स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईमुळे महामार्गावरील एक दरोड्याचा आणि तीन जबरी चोरीचे असे एकूण चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार, महामार्गावरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या पथकाला ११.१२.२०२५ रोजी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीद्वारे आरोपी कळंब, जि. धाराशिव येथून केजच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर पथकाने तातडीने नाकाबंदी लावली. आरोपींनी पोलिसांना पाहून गाडी न थांबवता पुढे पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून गुन्हेगारांना त्यांच्या एमजी हेक्टर कारमधून ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि स्थानिक गुन्हे शाखा, बीडचे पो.नि. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, मुन्ना वाघ, राहुल दशांदे, बाळूसानप आणि पोलीस अंमलदार अर्जुन यादव, आषपाक सय्यद, मनोज परजणे, अंकुश वरपे, आनंद मस्के, स्वाती मुंडे, विकी सुरवसे, तसेच वाहन चालक नितीन वडमारे यांनी मिळून केली आहे.
घडलेल्या प्रमुख घटना
१ - दि. ०४.१२.२०२५, वडगाव ढोक (ता. गेवराई): रस्त्यावर जॅकेट घालून गाडी अडवून बाहेरील राज्यातील प्रवाशांना लुटून मारहाण करून सोने व रोख रक्कम चोरली. (पो. स्टे. गेवराई, गु.र.नां ७१४/२०२५)
२ - दि. २५.०९.२०२५, संभाजी महाराज चौक (बीड): पहाटे ५ वाजता चालक झोपले असताना वाहनाजवळ येऊन गाडीची काच फोडली, आत बसलेल्या प्रवाशांना मारहाण करून सोने-चांदीचे दागिने हिसकावून चोरले. (पो. स्टे. बीड ग्रामीण, गु.र.नां ३१६/२०२५)
३ - दि. २०.११.२०२५, हॉटेल दुबई समोर: गाडी पार्क करून झोपलेल्या प्रवाशांच्या गाडीची काच रॉडने फोडून, शस्त्राचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू चोरल्या. (पो. स्टे. बीड ग्रामीण, गु.र.नां ४०२/२०२५)
४ - दि. ०९.११.२०२५, धनवडे वस्ती (पाली): रात्री आयआरबी पार्किंग एरियाजवळ वाहन अडवून शस्त्राचा धाक दाखवून खिशातील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. (पो. स्टे. बीड ग्रामीण, गु.र.नां ४१७/२०२५)
अटक केलेले आरोपी (सर्व रा. मकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव):
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. राहुल अनिल काळे (वय १९ वर्षे) २. विकास अनिल काळे (वय २१ वर्षे) ३. अनिल राम काळे (वय ४० वर्षे) या आरोपींनी त्यांचे साथीदार सुनील हिरमन दशांदे, सचिन ऊर्फ आवडया राम काळे आणि बबलू शिव दशांदे (सर्व रा. मकरवाडी) यांच्यासह मिळून वरील चारही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त
आरोपींकडून काळ्या रंगाची विना नंबरची एमजी हेक्टर कार, तसेच वाहनाच्या डिक्कीमध्ये असलेले एक कोयता आणि लोखंडी रॉड जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना १२.१२.२०२५ रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस ठाणे गेवराईचे सपोनि अण्णासाहेब पवार हे करत आहेत.