वाराणसीवरून भैरवनाथाच्या जलाभिषेकासाठी सात वर्षांपासून कावड आणतोय मुस्लिम मावळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 13:14 IST2023-12-09T13:13:51+5:302023-12-09T13:14:43+5:30
विशेष म्हणजे, शिवजयंतीला मावळा वेश परिधान करून शिवनेरी ते सांगवी गावी पायी ज्योत समीर घेऊन येतो.

वाराणसीवरून भैरवनाथाच्या जलाभिषेकासाठी सात वर्षांपासून कावड आणतोय मुस्लिम मावळा!
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : 'तू हिंदू बनेगा ना, मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद हे तू इन्सान ही बनेगा' अगदी या गीताप्रमाणे सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवत मुस्लिम मावळा समीर शेख हा वाराणसीहून ग्राम दैवत भैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यात जलाभिषेकासाठी कावड घेऊन येत आहे. विशेष म्हणजे, मागील सात वर्षांपासून समीर मनोभावे कावड आणून सर्वधर्मसमभावाचा मोठा संदेश देत आहे.
आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथील समीर शेख हा मुस्लिम तरूण उच्च शिक्षित आहे. धर्माच्या भिंती तोडत समीर कायम सामाजिक कार्यात अग्रसर आहे. गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवाच्या जन्मोत्सव सोहळ्यात देखील त्याचा सक्रिय सहभाग आहे. यातूनच मागील सात वर्षांपासून भैरवनाथाला जलाभिषेक करण्यासाठी गावातील भाविकांसोबत १५०० किलोमीटर दूर वाराणसी येथे जात समीर कावड घेऊन येतो. मुस्लिम तरुणाची अशी धर्मवीरहित कृती आदर्श घालून देत आहे. सर्वधर्मसमभावचे दर्शन घडवणाऱ्या समीरचे कावड आणण्याचे यंदाचे सातवे वर्ष आहे. विशेष म्हणजे, शिवजयंतीला मावळा वेश परिधान करून शिवनेरी ते सांगवी गावी पायी ज्योत समीर घेऊन येतो.
आपण सर्व भारतीय आहोत.जातीचा कुठलाच गर्व नसावा. सर्वधर्मसमभाव जपला जावा. यासाठी मी कायमच प्रयत्न करत राहील. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे काम सुरू ठेवणार असल्याचे समीर शेख यांनी लोकमतला सांगितले.