क्षुल्लक कारणावरून मित्रानेच केला मित्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST2021-03-27T04:35:38+5:302021-03-27T04:35:38+5:30
माजलगाव : शहरातील आझादनगर भागात राहणारा भागवत अशोक आगे व त्याचा मित्र महेश अशोक सोळंके यांच्यात मंगळवारी क्षुल्लक ...

क्षुल्लक कारणावरून मित्रानेच केला मित्राचा खून
माजलगाव
: शहरातील आझादनगर भागात राहणारा भागवत अशोक आगे व त्याचा मित्र महेश अशोक सोळंके यांच्यात मंगळवारी क्षुल्लक कारणावरून नवीन बसस्थानकात मारहाण झाली होती. यात भागवत आगे जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मयत व आरोपी हे दोघे अनेक वर्षांपासून मित्र होते. हे दोघे मंगळवारी सोबत जेवण करून नवीन बसस्थानकात असलेल्या शौचालयाजवळ बसले असता त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. भागवत आगे याने महेश सोळंके यास चाकूने मांडीवर वार केला. त्यानंतर महेश सोळंके यांनी त्याचा भाऊ व मित्रांना तेथे बोलावून घेतले. यानंतर बाचाबाची होऊन महेश सोळंके, मारोती सोळंके व अशोक सावंत या तिघांनी मिळून भागवत यास मारहाण करत चाकू व दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले होते. भागवतच्या डोक्यात व गुप्त अंगावर जखमा झाल्या होत्या. त्याला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करत त्याला बीड येथे पुढील उपचारासाठी पाठवले होते. उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.
याप्रकरणी विजय अशोक आगे याच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिसात महेश अशोक सोळंके, मारोती अशोक सोळंके रा. फुलेनगर, अशोक सावंत रा. शिवाजीनगर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील महेश सोळंके यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत.