पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिक्षण मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:18+5:302021-07-02T04:23:18+5:30
सिरसाळा : कोरोना या महामारीमुळे अनेक चिमुकल्यांनी आपले छत्र गमावल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जेथे जगणे मुश्कील झाले ...

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिक्षण मोफत
सिरसाळा : कोरोना या महामारीमुळे अनेक चिमुकल्यांनी आपले छत्र गमावल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जेथे जगणे मुश्कील झाले तेथे उद्याच्या शिक्षणाचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न निर्माण होतो. अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी पहिली ते बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय परळी तालुक्यातील सिरसाळा येथील राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेच्या अपेक्षा पब्लिक स्कूल व अर्जुनेश्वर विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाने घेतला आहे.
सोमवारपासून ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती डबघाईला गेल्याने पाल्यांना ऑनलाईन शिक्षण देणे कठीण झाले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण मोफत देण्याचा निर्णय संस्थेने घेतला. ऑनलाईन शिक्षणप्रणालीत अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना मोबाईलचे सॉफ्टवेअर देण्यात येणार असून त्यामध्ये दररोज तीन लाईव्ह तासिका होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना होमवर्क, मार्गदर्शन व होमवर्क तपासणी हे सर्व विद्यार्थ्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन केले जाणार असून, सर्व विद्यार्थ्यांच्या पुस्तकसंचांचे वाटप सुरू केले आहे, अशी माहिती मुख्याध्यापक अशोक देशमुख व अनिल होके यांनी दिली.
समाजाचे काही देणं लागतो
अपेक्षा पब्लिक स्कूल व अर्जुनेश्वर विद्यालयाचे सचिव अनिल जाधव यांनी सांगितले की, परिसरातील शेतकरी दाम्पत्याने, कोरोनामुळे काही पालकांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. भलेही आपण समाजासाठी इतर काही देऊ शकलो नसलो तरी आपल्याकडे जे आहे ते तरी आपण देऊ शकतो; म्हणून कोरोनाच्या काळात ज्या मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरपले, अशा जिल्ह्यातील त्या सर्व मुलांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च आम्ही संस्थेमार्फत करणार आहोत, असे जाधव यांनी सांगितले.
010721\01_2_bed_4_01072021_14.jpg
जाधव सिरसाळा