चोरीस गेलेला चार लाख रुपयांचा मुद्देमाल केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:02 IST2019-12-07T00:01:35+5:302019-12-07T00:02:05+5:30
शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ४ लाख ३२५ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला.

चोरीस गेलेला चार लाख रुपयांचा मुद्देमाल केला परत
बीड : जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडतात. यातील आरोपी पकडल्यानंतर त्याच्याकडून फिर्यादीचा चोरीस गेलेला मुद्देमाल मिळवणे हे पोलिसांसमोर आव्हान असते. ते पेलत पोलिसांकडून मुद्देमाल जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न असतो. मुद्देमाल मिळवल्यानंतर तो फिर्यादीपर्यंत पोहचवण्यासाठी मुद्देमाल वाटप कार्यक्रम घेण्यात येतो. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ४ लाख ३२५ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला.
यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख भारत राऊत, बीड ग्रामीण ठाण्याचे प्रमुख सुजित बडे, सपोनि पंकज जाधव यांच्यासह फिर्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ११ पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या दरोडा १, जबरी चोरी २, घरफोडी ३, चोरी १२, खंडणी १, बेवारस १ अशा ९ गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, १० गुन्ह्यातील दुचाकी असा मुद्देमाल फिर्यादीस पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते परत करण्यात आला आहे.
यावेळी पोद्दार म्हणाले, चोरीस गेलेला मुद्देमाल, ऐवज याची किंमत जरी कमी असली तरी तो परत मिळणे गरजेचे असते. त्या वस्तूसोबत आपली भावनिकता दडलेली असते. त्यामुळे चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर प्रत्येकी दोन महिन्यास एकदा तो फिर्यादीला देण्याचा कार्यक्रम घेतला जावा. यावेळी बर्दापूर येथील उपस्थित फिर्यादी किरण मधुकर बिडवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मला सोन्याचे दागिने सन्मानपूर्वक मिळाले. मुलीच्या लग्नासाठी हे दागिने व पैसे जमा केले होते. ते चोरीस गेल्यामुळे मी पुरता कोलमडलो होतो. परंतु पोलिसांमुळे ते मला परत मिळाले, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी इतर फिर्यादींनी देखील पोलीस प्रशासनाचे आभार मानले. मुद्देमाल परत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच इतर गुन्हे देखील लवकरच उघडकीस आणून मुद्देमाल परत केला जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आले.