सौताडा घाटात ट्रक उलटून चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:50 IST2019-12-14T23:50:17+5:302019-12-14T23:50:42+5:30
कोळसा घेऊन येणारा ट्रक उलटून बीडच्या दिशेने दोन दुचाकीवरुन येणारे चौघे जखमी झाल्याची दुर्घटना पाटोदा तालुक्यातील सौताडा घाटात शनिवारी सायंकाळी घडली.

सौताडा घाटात ट्रक उलटून चौघे जखमी
आष्टी : कोळसा घेऊन येणारा ट्रक उलटून बीडच्या दिशेने दोन दुचाकीवरुन येणारे चौघे जखमी झाल्याची दुर्घटना पाटोदा तालुक्यातील सौताडा घाटात शनिवारी सायंकाळी घडली.
बीडकडून एक ट्रक (एम एच ४२/ एम ९४९३) कोळसा घेऊन भिगवणकडे निघाला होता. सौताडा घाटात चालक मधुकर सुतार यांचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक उलटला. यावेळी ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीवरील चौघे जखमी झाले.
मोहन सुखदेव पवळ, गोपीनाथ बाबासाहेब पवळ (रा.चुंबळी ता. पाटोदा) यांची दुचाकी (एम.एच.२३ पी. ६२७) ट्रकखाली दबली. अन्य एका दुचाकीवरुन (एम.एच.२३ एम ९८८०) समीर हाफिजोद्दिन काझी व त्यांची आई नसीमा बेगम हाफिजोद्दिन काझी (रा.आष्टी) येत होते.
यात समीर यांचा पाय मोडला असून त्यांना नगरच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तर नसीमा बेगम या किरकोळ जखमी झाल्या. अपघातानंतर अनिल अडाले, महादेव वाघमारे, अनिल रेडे, अफसर शेख तसेच परिसरातील लोकांनी जखमींना मदत केली. तर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत जामखेड येथील खाजगी रुग्णालयात जखमींना दाखल केले.