बीडमधील चार महत्त्वाचे ठाणेदार अचानक बदलले; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा?
By सोमनाथ खताळ | Updated: November 4, 2025 16:19 IST2025-11-04T16:15:02+5:302025-11-04T16:19:39+5:30
गेवराई, शिवाजीनगर, बीड ग्रामीण आणि पेठबीड ठाण्यातील निरीक्षकांच्या बदल्या

बीडमधील चार महत्त्वाचे ठाणेदार अचानक बदलले; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा?
बीड: जिल्ह्याच्या पोलीस दलात अचानक मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांतील निरीक्षकांच्या बदल्यांमुळे चर्चा सुरू झाली आहे. काही राजकीय लोकांनी हस्तक्षेप केल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या बदल्यांवर स्पष्टीकरण देताना पोलीस अधीक्षकांनी संबंधित ठाणेदारांनी विनंती अर्ज केल्यामुळेच या बदल्या करण्यात आल्याचा दावा केला आहे.
या बदल्यांमध्ये चार पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याची जबाबदारी मिळाली आहे, तर शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना गेवराई पोलीस ठाण्यावर पाठवण्यात आले आहे. तसेच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना पेठबीड ठाण्यात हलवण्यात आले आहे, तर पेठबीडचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या अदलाबदलीमुळे बीडच्या पोलीस प्रशासनात आणि स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. बदलीचे नेमके कारण काय, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
बांगर यांचे विधानसभेत काम
प्रविणकुमार बांगर यांनी विधानसभा निवडणूकीत गेवराईत बंदोबस्त केला होता. यासोबतच मराठा - ओबीसी वादही त्यांनी हाणून पाडला होता. दोन्ही समाजातील लोकांची बैठक घेत काही जणांवर प्रतिबंधात्म कारवाया केल्या. काही लोकांवर गुन्हेही दाखल केले होते. तसेच बीड ग्रामीणचे मारूती खेडकर यांचाही बीड ग्रामीण ठाण्यात जम बसला होता. आता त्यांच्या जागेवर पेठबीडमध्ये वेगवेगळ्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या अशोक मुदिराज यांना नियूक्त करण्यात आले आहे.