Maharashtra Cabinet ( Marathi News ) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथील राजभवनावर पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजप आमदार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख असलेल्या या मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी घेतलेली मंत्रिपदाची शपथ राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवगंत गोपीनाथ मुंडे यांच्याशी झालेल्या राजकीय मतभेदानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर धनंजय यांनी परळीतून २०१४ साली पंकजा मुंडे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी ४० हजारांहून अधिक मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. या राजकीय संघर्षामुळे भावा-बहिणीच्या नात्यातील दरीही वाढली होती. मात्र २०२३ मध्ये राजकीय समीकरणे बदलली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली. धनंजय मुंडे यांनीही अजित पवारांची साथ दिल्याने त्यांना तेव्हाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. मात्र २०१९ च्या पराभवामुळे सभागृहाबाहेर असलेल्या पंकजा मुंडे यांच्या नशिबी राजकीय वनवास होता.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मुंडे बहीण-भाऊ पूर्ण ताकदीने एकत्र आले होते. पण तरीही पंकजा मुंडे यांना ६ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भाजपने पंकजा यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यामुळे आमदार झालेल्या पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये संधी मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. तर दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग इथं झालेल्या सरपंच हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी होत होती. त्यामुळे मुंडे बहीण-भावाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये धाकधूक होती. परंतु आता अखेर भाजपने पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असून आज या दोघांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.