वडगावच्या माजी सरपंचाला पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:02+5:302021-03-13T05:00:02+5:30
परळी : तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील राखेचे प्रदूषण थांबवावे, या मागणीसाठी एक महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करूनही ...

वडगावच्या माजी सरपंचाला पोलिसांनी घेतले ताब्यात
परळी : तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील राखेचे प्रदूषण थांबवावे, या मागणीसाठी एक महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करूनही परळी औष्णिक विद्युत केंद्रावर प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही. उलट राखेची वाहतूक जोरात चालू असून, प्रदूषणात वाढ झाली आहे, त्याच्या निषेधार्थ गुरुवारी आत्मदहन करण्याचा इशारा दादाहरी वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता. या पार्श्वभूमीवर शिवाजी शिंदे यांना बुधवारी रात्री एक वाजता परळी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. आत्मदहन आंदोलन करणार नाही, असे लिहून गुरुवारी घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी घरी येऊन रात्री एक वाजता मला अंगात पँट ,शर्टसुद्धा घालू दिले नाही. बनियन व लुंगीवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून चार तास बसवून ठेवले व आत्मदहन करणार नाही, असे माझ्याकडून लिहून घेतले. त्यानंतरच मला पोलीस ठाण्यातून सोडून दिल्याचे शिवाजी शिंदे यांनी लोकमतला सांगितले. शिवाजी शिंदे हे दादाहरी वडगावचे माजी सरपंच शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते राखेच्या प्रदूषणावर आवाज उठवित आहेत.