बीड : कोरोना महामारीमुळे जवळपास पावणे दोन वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला आता मुहूर्त मिळाला आहे. यासाठी २०१९ मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केले, ते ग्राह्य धरले जाणार आहेत. मात्र, अर्ज अपडेट करावा लागणार आहे. काही उमेदवार ऑनलाइन अर्जाचा पासवर्ड विसरून गेल्याने मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
सप्टेंबर २०१९ मध्ये पोलीस भरतीची जाहिरात निघाली होती. उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. मात्र, पुढे कोरोना महामारीचे संकट आले आणि भरती प्रक्रिया पुढे ढकलावी लागली. आता दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पूर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज केले तेच अर्ज अपडेट करून भरावयाचे आहेत. शिवाय नवीन प्रोफाईल पासवर्ड टाकायचा आहे. २०१९ मध्ये महापरीक्षा या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरले होते. आता महापरीक्षाऐवजी जिंजर या कंपनीतर्फे प्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र, त्यासाठी ॲप्लिकेशन आयडी व पासवर्डची गरज आहे; त्याशिवाय तेव्हाचे ॲप्लिकेशन उघडत नाही. काहीजणांच्या आता पासवर्ड लक्षात राहिलेला नाही; तर काहीजण आयडीसुद्धा विसरून गेले आहेत. प्रोफाईल अपडेट झाल्याशिवाय या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार पात्र होणार नाही. त्यामुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
....
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रांसाठी लूट
सन २०१९ मध्ये मराठा समाजाला एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग) आरक्षण होते. आता ते रद्द झाले असून ईडब्ल्यूएस (आर्थिक मागास प्रवर्ग) या १० टक्के आरक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. या प्रमाणपत्रांसाठी तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी होऊ लागली आहे. याचा फायदा घेत दलाल सक्रिय झाले असून, एक हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे उमेदवारांना नाहक खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
............................
प्रमाणपत्रांसाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही. कोणी पैसे मागत असेल तर तक्रार करावी. जेवढे अर्ज आले ते पडताळून निकाली काढण्याचे काम सुरू आहे. प्रमाणपत्रांसाठी कोणाचीही अडवणूक होणार नाही.
- शिरीष वमने, तहसीलदार, बीड
....
१५ ऑगस्टची अंतिम मुदत
उमेदवारांना प्रोफाइल अपडेट करण्यासाठी इंटरनेट कॅफेवर शंभर रुपयांपर्यंत खर्च येतो. अर्ज अपडेट करण्यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे प्रमाणपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. प्रमाणपत्रांसाठीही खिशाला झळ पोहोचत असल्याने खर्च कुठवर करायचा, असा प्रश्न सुदर्शन लांडे या उमेदवाराने उपस्थित केला.
....
पाच हजार जागा, हजारो उमेदवारांना फटका
यापूर्वी २०१८ मध्ये पोलीस भरती झाली होती. तब्बल तीन वर्षांनंतर पाच हजार २८९ जागांसाठी आता भरती होणार आहे. यात राज्य राखीव दल, वाहनचालक, लोहमार्ग, विविध जिल्हे व कारागृह या विभागांसाठी मनुष्यबळ भरती केले जाणार आहे. ॲप्लिकेशन क्रमांकावरून प्रोफाइल उघडण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल वाईकर यांनी केली आहे.
....
स्वप्न अधुरे राहण्याची भीती
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील अशोक अनभुले हा सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण. २०१८ पासून तो पोलीस भरतीची तयारी करीत आहे. आधी भरतीसाठी प्रतीक्षा करावी लागली. कोरोनामुळे गावी जाऊन शेती केली. आता ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी चार दिवसांपासून तहसील कार्यालयात चकरा मारीत आहे. मात्र, प्रमाणपत्र मिळत नाही. मादळमोहीच्या अशोक अनभुलेची व्यथाही काहीशी अशीच. पासवर्ड विसरल्याने प्रोफाइल उघडत नाही. परिणामी पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची भीती त्याने व्यक्त केली.
....