फुलोऱ्यातील सोयाबीन पावसाअभावी कोमेजू लागले - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST2021-08-13T04:38:02+5:302021-08-13T04:38:02+5:30
माजलगाव : कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले. तालुक्यात वेळेत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा ...

फुलोऱ्यातील सोयाबीन पावसाअभावी कोमेजू लागले - A
माजलगाव
: कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले. तालुक्यात वेळेत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा झाला; परंतु मागील तीन आठवड्यांपासून पावसाचा थेंबही नसल्याने सोयाबीनची फुले कोमेजू लागली आहेत.
माजलगाव तालुक्यात मागील ५-६ वर्षांपासून कापसाचे क्षेत्र घटले. सोयाबीनच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होत असे; परंतु हे पीक खर्चिक होत चालल्याने शेतकरी कमी खर्चात चांगले उत्पन्न असलेल्या सोयाबीनकडे वळले.
गेल्यावर्षी माजलगाव तालुक्यात कापसाचा पेरा ३० हजार हेक्टर, तर सोयाबीन २३ हजार हेक्टरवर होते. गेल्यावर्षी सोयाबीनला ९ हजारांपर्यंत भाव मिळाल्याने यावर्षी कापसाच्या पेरा कमी होऊन ते २७ हजार हेक्टर झाला, तर सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन २८ हजार हेक्टर झाले.
सोयाबीनला वेळोवेळी पाऊस राहिला, तर सोयाबीनचे पीक अतिशय जोमात येते; परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्यास सोयाबीनला चांगलाच फटका बसतो. मागील तीन आठवड्यांपासून पावसाचा एक थेंबही न पडल्याने जोमात आलेली व सध्या फुले लागत असलेल्या सोयाबीनला चांगलाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, कडक उन्हामुळे सोयाबीनची फुले कोमेजू लागली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
मागील अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन सुकू लागले आहेत. जोमात आलेले पीक पाण्यामुळे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात कमालीचे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीनला पाणी देण्यासाठी धडपड करीत आहेत.
सध्या सोयाबीनचे पीक जोमात असून त्याला पाऊस नसल्याने या पिकाला धोका निर्माण झाला आहे. सध्या हलक्या जमिनीतील सोयाबीन सुकू लागले असून, काळया जमिनीतील सोयाबीनला अद्याप काही फरक पडलेला नाही. १३ तारखेनंतर पावसाची शक्यता असून, तो पडल्यास सोयाबीनला चांगलाच फायदा होईल.
--- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव