एफआयआर राकाँ कार्यकर्त्यांवर, हल्लेखोर निघाले शिवसेनेचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:37+5:302021-09-04T04:40:37+5:30
बीड : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप (रा. भवानवाडी, ता. बीड) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना पुलावरून फेेकण्याचा प्रयत्न झाल्याची ...

एफआयआर राकाँ कार्यकर्त्यांवर, हल्लेखोर निघाले शिवसेनेचेच
बीड : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप (रा. भवानवाडी, ता. बीड) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना पुलावरून फेेकण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना ३० ऑगस्ट रोजी घडली होती. उपजिल्हाप्रमुख जगताप यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या तपासात या हल्ल्यामागे शिवसेनेचे समर्थक असल्याची बाब समोर आली असून, ३ सप्टेंबर रोजी दोघांना शहरातून अटक करण्यात आली.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांचे बंधू व दोन पुतणे यांच्यावर नुकतीच हद्दपारीची कारवाई झाली होती. २८ ऑगस्ट रोजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक पार पडली. यात उपजिल्हाप्रमुख जगताप यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना जिल्हाप्रमुखांवर आरोप केला होता. अशातच ३० ऑगस्ट रोजी त्यांच्यावर हल्ला झाला. यानंतर परस्परविरोधी तक्रारींवरून १४ जणांवर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. उपजिल्हाप्रमुख जगताप यांनी रायुकाँ तालुकाध्यक्ष नंदू अंकुश कुटेसह ९ जणांवर फिर्याद नोंदवली होती. पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप यांनी तपासचक्रे गतिमान केली. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी दत्ता जाधव व ईश्वर देवकर (दोघे रा. पेठ, बीड) यांना दुपारी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ते दोघे शिवसेनेचे समर्थक असल्याची माहिती आहे.
....
शिवसेनेचे बूमरँग
दरम्यान, उपजिल्हाप्रमुख जगताप यांच्यावरील हल्ल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते. मात्र, तपासात या हल्ल्याचे धागेदोरे शिवसेनेपर्यंत असल्याचे निष्पन्न झाल्याने हे प्रकरण शिवसेनेवरच बूमरँग झाले आहे. आता तपास आणखी किती खोलात जातो अन् हल्ल्याचा सूत्रधार कोण निघतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
....
अटकेची गुप्तता, आमदार एसपींच्या भेटीला
पिंपळनेर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या.
आरोपी शिवसेनेचे समर्थक असल्याचे कळाल्यावर आमदार संदीप क्षीरसागर हे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना भेटले. दुसरीकडे दुपारपासून दोन्ही आरोपींची उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या दालनात कसून चौकशी करण्यात आली. यावेळी गोपनीयता पाळण्यात आली. सायंकाळी सात वाजेनंतर दोघांच्या अटकेची कार्यवाही करण्यात आली.
.....