निर्घुणता ! दगडाने डोके चेंदामेंदा करत ४० वर्षीय महिलेची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 19:41 IST2020-11-25T19:30:14+5:302020-11-25T19:41:13+5:30
केज तालुक्यातील डोका (हादगाव) शिवारात महिलेचा मृतदेह आढळला

निर्घुणता ! दगडाने डोके चेंदामेंदा करत ४० वर्षीय महिलेची हत्या
केज ; सांगली येथून केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे आत्याच्या वर्षश्राद्धासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. मीरा बाबुराव रंधवे असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
मीरा बाबुराव रंधवे या सांगली येथे आपल्या कुटुंबासोबत राहत. त्या डोका गावी आत्या गांधारी इनकर यांच्या वर्षश्राद्धासाठी आल्या होत्या. मंगळवारी ( दि. २४ ) केज शहरातील एका कपड्याच्या दुकानातून त्यांनी कपडे खरेदी केले. रात्री सुमारे ९:३० वा. च्या दरम्यान डोका येथे त्या परतल्या. भांगे-इनकर वस्तीवरील वडिलांच्या घराकडे जात असताना बोभाटी नदी शेजारील शेतात त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने दगडाने हल्ला केला. हल्लेखोराने निर्घुरपणे त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. ओळख पटू नये म्हणून पूर्ण चेहरा विद्रूप करत डोके चेंदामेंदा केले. घटनास्थळावर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, पोलिस जमादार अमोल गायकवाड, आदी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. महिलेचे शव विच्छेदन अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे.