खुराकासाठी बापाने विकली ५ एकर शेती, मुलाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 'सुवर्ण' बाजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:14 IST2025-10-17T18:13:26+5:302025-10-17T18:14:07+5:30
दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या वडिलांच्या त्यागाची परतफेड

खुराकासाठी बापाने विकली ५ एकर शेती, मुलाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 'सुवर्ण' बाजी!
- नितीन कांबळे
कडा :कुस्तीतील वडिलोपार्जित परंपरा जपण्यासाठी पाच एकर शेती विकून मुलाला पैलवान बनवणाऱ्या एका वडिलांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील आतिश तोडकर याने नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या वडिलांच्या त्यागाची परतफेड केली आहे.
आतिशचे वडील सुनील तोडकर यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. तरीही, घरात पैलवान तयार व्हावा या ध्येयाने त्यांनी कर्ज आणि उधारी केली. एवढेच नव्हे तर, मुलाला कुस्तीचे योग्य प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना पाच एकर वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. दहा वर्षांचा असल्यापासून आतिशने वडील व चुलत्यांसोबत तालमीत सराव सुरू केला. त्याची प्रगती पाहून त्याला प्रथम प्रा. दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी येथे, तर नंतर दिल्लीतील वीरेंद्र स्पोर्ट्स अकादमी येथे १० वर्षे प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आले.
आतापर्यंत कोणती पदके मिळवली?
नुकतेच आतिशने ऑल इंडिया इंटर रेल्वे चॅम्पियनशिप (दिल्ली) स्पर्धेतील ६१ किलो फ्री स्टाईल वजन गटात ५-८ गुणांकनांनी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. आतिशने आजवर १९ वेळा राष्ट्रीय (नॅशनल) स्तरावर खेळून ४ वेळा सुवर्ण, ३ वेळा रौप्य आणि ४ वेळा कांस्य पदक जिंकण्याची दमदार कामगिरी केली आहे. 'पट डाव' हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. आतिशच्या यशाने समाधानी असलेले वडील सुनील तोडकर यांचे आता अंतिम ध्येय हे "आतिशला ऑलिम्पिक स्पर्धेत खेळताना पाहणे" हे आहे. त्यांच्या या त्यागामुळे कुस्तीच्या रांगड्या खेळाची परंपरा ग्रामीण भागात आजही जिवंत असल्याचे दिसून येते.