ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST2021-01-09T04:27:57+5:302021-01-09T04:27:57+5:30
कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया ...

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया जाण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत आहेत.
यावर्षी पाऊस जोरदार पडल्याने तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर रबीची पेरणी झाली. कमी पाण्यात लवकर येणाऱ्या गव्हाच्या जाती उपलब्घ असल्यानेही गव्हाचे क्षेत्र वाढलेले आहे. मात्र, रबी हंगामावर यावर्षी ढगाळ वातावरणाचे सावट आहे. रोगांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागली. त्यातच चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. शिवाय सकाळी दाट धुक्याची चादर पडत असल्याने रबी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. येथील कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना विचारणा केली असता सध्या ढगाळ वातावरणामुळे अळी व किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यापासून बचाव करण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले.
आभाळाचा कांद्यावर परिणाम
मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर गगनाला भिडल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. सहा हजार रुपये किलोप्रमाणे बियाणे खरेदी करून कांद्याची लागवड केलेली आहे. मात्र, आठ दिवसांपासून आष्टी तालुक्यात सूर्यदर्शनच झाले नाही. ढगाळ वातावरणाचा कांद्याच्या पिकावर मोठा परिणाम झालेला आहे. शेतातच कांद्याचे रोपे जागेवर जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
हरभरा पडतोय पिवळा
हरभराही ढगाळ वातावरणाने पिवळा पडला आहे. या रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांना आता औषध फवारणी करणे गरजेचे झाले आहे. ज्वारी पिकावरही ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम झालेला पहावयास मिळत आहे. ज्वारीला सध्या दाणे भरत असून अनेक ठिकाणी चिकटा रोग पडल्याने ज्वारीचे पीकही धोक्यात आले आहे. तर ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने गव्हावर मावा आला आहे. काही भागांत गव्हावर अळीचाही प्रादुर्भाव झाला आहे.
उत्पन्न घटण्याची भीती
गेल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे, तर जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी थंडी अजूनही वाढलेली नाही. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे.
- हरिभाऊ सांगळे ,शेतकरी.
पाणी आहे तर निसर्ग साथ देईना
मागील तीन वर्षे दुष्काळात गेल्याने नियोजित पिके घेता आली नाहीत. यावर्षी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले आहे. परिणामी यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावरदेखील पाणी फेरते की काय? या धास्तीने शेतकरीवर्ग सध्या चिंतेत आहे.
-अनंत कर्डीले , शेतकरी.